प्लास्टिक बाटल्यांपासून विद्यार्थ्यांनी बनविली नौका
By admin | Published: March 8, 2016 12:01 AM2016-03-08T00:01:44+5:302016-03-08T00:01:44+5:30
स्थानिक कॅम्प परिसरातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मिनरल वॉटरच्या निरुपयोगी बाटल्यांचा वापर करून नाव तयार केली.
अमरावती : स्थानिक कॅम्प परिसरातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मिनरल वॉटरच्या निरुपयोगी बाटल्यांचा वापर करून नाव तयार केली. ही नाव केवळ पाण्यावर तरंगतच नाही तर तीत पाच व्यक्ती नौकाविहार करू शकतात. वडाळी तलावात या नावेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नौकाविहाराचा आनंद लुटला.
शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये टाकाऊ वस्तू गोळा करण्याची ‘कबाड-जुगाड’ खोली आहे. शाळेतील जुने साहित्य या खोलीत जमा केले जाते. त्या वस्तुंचा वापर करून त्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीच्या बळावर नवनवे प्रयोग केले जातात. एकूण येथे ‘कचऱ्यातून कला’ निर्माण करण्याचे शिक्षण आणि स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. कल्पनाशक्तीच्या बळावर येथील विद्यार्थ्यांनी आजवर अनेक प्रयोग केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचा शाळेचा प्रयत्न असतो.
प्लॅटफॉर्मसाठी प्लायवूडचा वापर
अमरावती : पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांपासून नाव तयार करण्याकरिता विद्यार्थ्यांना शाळेचे विज्ञान शिक्षक प्रवीण गुल्हाने यांनी डिझाईन तयार करून दिले. त्यानुसार प्लास्टिकच्या बाटल्या तारांच्या साहाय्याने मजबुतीने बांधण्यात आल्या. एकावर एक असे तीन थर रचून प्लॅटफार्मसाठी त्यावर प्लायवुड टाकण्यात आले. हवेच्या दाबामुळे हा प्लॅटफार्म तरंगतो. त्याला चारही बाजूने आधार देण्यासाठी बाटल्यांचे दोन थर रचण्यात आले.
आकर्षकपणा वाढविण्यासाठी विशिष्ट आकार व रंगांच्या बाटल्यांचा कौशल्याने वापर करण्यात आला. या नावेची येथील वडाळी तलावात चाचणी घेण्यात आली. नावेत पाच जणांनी विहार केल्याने नाव अगदी ‘परफेक्ट’ असल्याचे सिध्द झाले.
२० विद्यार्थ्यांचा सहभाग, ७०० बाटल्यांचा वापर
प्लास्टिक बाटल्यांपासून नाव तयार करण्याच्या प्रयोगात शाळेच्या ७ व्या वर्गातील २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यासाठी मुलांनीच ७०० बाटल्या गोळा केल्यात. संस्थापक अतुल गायगोले, संचालिका अमृता गायगोले व विज्ञान शिक्षक प्रवीण गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात नाव तयार करण्यात आली.
वडाळी तलावात नौकाविहार
मुलांनी तयार केलेल्या या अनोख्या नावेची यशस्वी चाचणी येथील वडाळी तलावात घेण्यात आली. ही नाव पाण्यावर तरंगते. नावेत पाच व्यक्ती बसू शकतात. चाचणीच्यावेळी वडाळी तलाव परिसरात अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यांनीदेखील या नावेत स्वार होऊन नौकाविहाराचा आनंद लुटला.
विद्यार्थ्यांच्या उपजत व सुप्त कलागुणांना वाव देणे व अल्पखर्चात टाकाऊ वस्तूंपासून उपयोगी वस्तू तयार करणे, हे शाश्वत शिक्षण आहे. याच उपक्रमातून मुलांनी कल्पकतेने ही नाव तयार केली आहे.
- अतुल गायगोले, संस्थाध्यक्ष, शाश्वत कन्सेप्ट स्कूल, अमरावती