गफ्फूर गँगला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

By admin | Published: June 18, 2016 12:10 AM2016-06-18T00:10:22+5:302016-06-18T00:10:22+5:30

शेतमाल व शेतीचे साहित्य चोरणाऱ्या कुख्यात गफ्फूर गँगला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले.

Yash with local crime branch to catch Gafoor Gang | गफ्फूर गँगला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

गफ्फूर गँगला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Next

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त : चौघांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद
अमरावती : शेतमाल व शेतीचे साहित्य चोरणाऱ्या कुख्यात गफ्फूर गँगला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले. या टोळीविरुद्ध अमरावती जिल्ह्यासह विविध शहरांतही गंभीर गुुन्ह्याच्या नोंदी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
काही महिन्यांपासून जिल्ह्यातील वरुड, बेनोडा, मोर्शी, शिरखेड, चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी या भागात शेतमाल व शेती साहित्य चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकाने चोरीच्या घटनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील काही गुन्हेगारांचा पूर्व इतिहास शोधून आरोपीचे शोधकार्य सुरू केले. दरम्यान लालखडी परिसरातील रहिवासी अब्दूल गफुर अब्दूल कादर (४६) हा चोराचा मुखीया असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. टोळी बनवून आरोपी गफ्फुर हा शेतमाल व शेती साहित्य चोरी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अब्दूल गफुरला लालखडी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याने जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच यवतमाळ, वाशीम, अकोला, जिल्ह्यातील १५ ते २० शेतमाल व शेती साहित्य चोरीच्या घटनांची कबुली दिली.
या गुन्ह्यात सहभागी असणारे अब्दूल गफ्फुर यांचे साथीदार गोपाल विठ्ठल चव्हाण (३०,रा. माताखिडकी), रहेमान शहा अयुब शहा (४०,रा. रोशन नगर), फारूख अली सादीक अली (४०,रा.लालखडी) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)

यवतमाळ, अकोला जिल्ह्यातून फरार
आरोपी अब्दूल गफ्फूर हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अमरावती ग्रामीण, यवतमाळ, वाशीम, अकोला, वर्धा जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. दरोडा, हत्येसह दरोडा, जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांची आरोपीविरुद्ध नोंद आहे. हे आरोपी यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये फरार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

आरोपींकडून
मुद्देमाल जप्त
अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन क्रमांक एमएच २७-एक्स-५९९३ व ब्राह्मणवाडा थडी येथून चोरी गेलेले २०० प्लास्टिक कॅरेट असा २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अपर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार व पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर, जमादार त्र्यंबक मनोहर, शिपाई सचिन मिश्रा, गजेंद्र ठाकरे, शकील चव्हाण, दिनेश कनोजिया, चालक सईद यांनी ही कारवाई केली.

Web Title: Yash with local crime branch to catch Gafoor Gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.