आॅनलाईन प्रश्न नोंदविण्यात यशोमती ठाकूर आघाडीवर
By admin | Published: November 18, 2015 12:20 AM2015-11-18T00:20:56+5:302015-11-18T00:20:56+5:30
विधिमंडळ सचिवालयाने यावर्षी ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आमदारांचे प्रश्न आॅनलाईन पध्दतीने मागविले आहेत.
हिवाळी अधिवेशन : जिल्ह्यातील सर्वच आमदारांची ‘डिजिटल महाराष्ट्र’ला साथ
अमरावती : विधिमंडळ सचिवालयाने यावर्षी ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आमदारांचे प्रश्न आॅनलाईन पध्दतीने मागविले आहेत. या ‘आॅनलाईन’ प्रणालीला जिल्ह्यातील आठही आमदारांनी उत्तम प्रतिसाद दिला. सर्वाधिक प्रश्न सादर करण्यात आ. यशोमती ठाकूर आघाडीवर आहेत. त्यांनी तब्बल १५० प्रश्न आॅनलाईन पध्दतीने सादर केले आहेत. नवख्या आ. प्रभुदास भिलावेकर, आ. रमेश बुंदिले यांनीदेखील ‘डिजिटल महाराष्ट्र’ला साथ दिल्याचे चित्र आहे.
पहिल्यांदाच ‘आॅनलाईन’ प्रश्न स्वीकारण्याचा निर्णय विधिमंडळ सचिवालयाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुनील देशमुख, रवी राणा, वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, अनिल बोंडे आमदारद्वयांनी जनतेच्या समस्या आॅनलाईन सादर करून त्या सोडविण्याची रणनीती आखली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठीदेखील आमदार पुढे सरसावले आहेत.