यशोमती ठाकुरांनी दिला अपंग महिलेला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:32 PM2018-02-27T22:32:59+5:302018-02-27T22:32:59+5:30
प्रतिभा सुरेश उमप या निराधार महिलेला गॅस कनेक्शन व शेगडी विकत घेऊन देत आ. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने तिला चूलमुक्त करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
तिवसा : प्रतिभा सुरेश उमप या निराधार महिलेला गॅस कनेक्शन व शेगडी विकत घेऊन देत आ. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने तिला चूलमुक्त करण्यात आले. उज्ज्वला योजनेच्या फोलपणाबाबत ‘लोकमत’ने सोमवारी सचित्र वृत्त प्रकाशित केल्यानंतर आ. ठाकूर यांनी तातडीने प्रतिभा उमप यांना गॅस कनेक्शन मिळवून दिले.
गॅस कनेक्शन व उज्ज्वला योजनेचा गवगवा करणाºया जाहिरातींमध्ये कोट्यवधींचा खर्च करणाºया सरकारचे लक्ष मूळ लाभार्थींकडे नसल्याचे वऱ्हा येथील प्रतिभा सुरेश उमप यांच्या अवहेलनेने दाखवून दिले. आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडून याविषयी माहिती घेतली. परंतु, निराधार असली तरी लालफीतशाहीत नाव अडकल्याने या महिलेस लाभ देता येणार नाही, असे सांगण्यात आले. यामुळे आ. यशोमती ठाकूर यांनी कुऱ्हा येथील संयुक्ता गॅस एजन्सीशी संपर्क साधून मित्र मंडळाने सदर गॅस कनेक्शन व शेगडी विकत घेतली. मंगळवारी अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या या महिलेला वऱ्हा येथील तिच्या घरी गॅस-शेगडी प्रदान करण्यात आली. यावेळी आ. यशोमती ठाकूर, उपसभापती लुकेश केने, न.प. उपाध्यक्ष वैभव वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.