बोगस बियाणे विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; 'त्या' शेतीच्या पंचनाम्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 10:34 AM2022-06-29T10:34:01+5:302022-06-29T10:49:55+5:30
जिल्ह्यात बोगस बियाणे विकणे, बियाण्याची उगवण न होणे आदी तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
अमरावती : बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्याचप्रमाणे, उगवण न झालेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात बोगस बियाणे विकणे, बियाण्याची उगवण न होणे आदी तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तिवसा तालुक्यात ‘ विक्रांत ’ या व्हरायटीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर उगवण न झाल्याची तक्रार शेतकरी बांधवांनी केली आहे. या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून घ्यावेत. प्रत्येक शेतकरी बांधवांशी संवाद साधून माहिती जाणून घ्यावी. त्याचप्रमाणे, बोगस बियाणे विकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
खते, बी-बियाणे यांचा काळाबाजार, साठेबाजी, बोगस बियाणे विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी व संबंधित सर्व विभागांनी काटेकोर कार्यवाही करावी. भरारी पथकांनी सक्रिय होऊन सातत्याने तपासण्या कराव्यात. शेतकरी बांधवांची फसवणूक झाल्यास खपवून घेतले जाणार नाही. कुठेही गैरप्रकार आढळून येत असतील तर दोषींवर कडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात कुठेही बोगस, अनधिकृत बियाणे विक्री आदींची माहिती मिळाल्यास तत्काळ भरारी पथकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जादा दराने विक्री, मुदतबाह्य मालाची विक्री, साठेबाजी, अनधिकृत निविष्ठांची विक्री अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भरारी पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.