यशोमती ठाकूर यांचे आज संचालकपदासाठी नामांकन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 05:00 AM2021-09-06T05:00:00+5:302021-09-06T05:01:03+5:30
जिल्हा बँक निवडणुकीत सर्वच राजकीय नेते मैदानात उतरले असल्याने या निवडणुकीत नेमके आहे तरी काय, असा सवाल सर्वसामान्यांपुढे उपस्थित होत आहे. ८ ते २२ सप्टेंबर दरम्यान नामांकन मागे घेण्याचा अवधी आहे. कोण मैदान साेडते, याकडे साऱ्यांच्या नजरा आता खिळल्या आहेत. जिल्ह्यातील दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर या निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने विद्यमान संचालक मंडळ कायम राहते की बँकेत ‘परिवर्तन’ होते, हे ५ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत संचालकपदासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर या नामांकन दाखल करणार आहेत. आता दोन मंत्री, चार आमदार आणि सहकार क्षेत्रातील जिल्ह्यातील दिग्गजांच्या उमेदवारीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.
बँक निवडणुकीत नामांकन दाखल करण्यासाठी ६ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. वर्षाला २४०० कोटींची उलाढाल असलेल्या या बँकेच्या २१ संचालकांना १६८६ मतदार निवडून देणार आहेत. शुक्रवारपर्यंत यासाठी ११८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. सोमवारी ना. यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख हेदेखील नव्याने नामांकन अर्ज दाखल करतील, असे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार बळवंत वानखडे, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, सुरेखा ठाकरे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आदींनी संचालकपदासाठी नामांकन दाखल केले. पडद्यामागून आमदार प्रताप अडसड हेदेखील या निवडणुकीत ‘गेम मास्टर’ची भूमिका बजावत आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीत सर्वच राजकीय नेते मैदानात उतरले असल्याने या निवडणुकीत नेमके आहे तरी काय, असा सवाल सर्वसामान्यांपुढे उपस्थित होत आहे. ८ ते २२ सप्टेंबर दरम्यान नामांकन मागे घेण्याचा अवधी आहे. कोण मैदान साेडते, याकडे साऱ्यांच्या नजरा आता खिळल्या आहेत. जिल्ह्यातील दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर या निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने विद्यमान संचालक मंडळ कायम राहते की बँकेत ‘परिवर्तन’ होते, हे ५ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सर्वांचीच एन्ट्री झाल्याने आता या निवडणुकीत ‘आगे आगे देखो होता है क्या?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
- तर जिल्हा बँक निवडणुकीत येणार रंगत
पालकमंत्री यशोमती ठाकूर या सोमवारी संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सहकार क्षेत्रात ‘एन्ट्री’साठी ना. ठाकूर यांनी गत दोन दिवसांपासून तिवसा, मोझरी येथील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांचे नामांकन कायम राहिल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंगत वाढणार आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची जिल्हा बँक निवडणुकीत एकजूट आहे. सहकार पॅनेल या नावाने पुन्हा बँकेवर संचालक मंडळ आणण्याची रणनीती ही मंडळी आखत आहेत.