आ. यशोमती ठाकूर संतापल्या, म्हणाल्या मी गंगा भागीरथी नाही!

By प्रदीप भाकरे | Published: April 14, 2023 02:44 PM2023-04-14T14:44:39+5:302023-04-14T14:45:37+5:30

राज्यात सध्या विधवांना गंगा भागीरथी म्हणण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा-वाद सुरू

Yashomati Thakur says I am not Ganga Bhagirathi! | आ. यशोमती ठाकूर संतापल्या, म्हणाल्या मी गंगा भागीरथी नाही!

आ. यशोमती ठाकूर संतापल्या, म्हणाल्या मी गंगा भागीरथी नाही!

googlenewsNext

अमरावती : होय, मी गंगा भागीरथी नाही, मी कधीही माझ्या नावासमोर तसा उल्लेख करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी अगदी निक्षून सांगते, हा असला निर्णय या राज्यात आम्ही होऊ देणार नाही. मी माझ्या पतीला गमावलं. त्यांच्या अचानक निधनानंतर मी माझ्या दोन मुलांना सांभाळलं, मोठं केलं. मला या देशातील संविधानामुळे समानतेचा, शिक्षणाचा अधिकार मिळाला. मी आज एक स्वतंत्र माणूस म्हणून जगतेय. गुलामगिरीच्या जोखडातून समस्त दलित-शोषित-वंचित आणि महिला मुक्त झाल्या. मात्र, तरीही ही जोखडं पुन्हा या सर्व वर्गाच्या गळ्यात बांधायचा घातक डाव मनुवादी लोक सातत्याने करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी हा डाव उधळून लावू, असा गर्भित इशारा माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्य शासनाला दिला आहे.

राज्यात सध्या विधवांना गंगा भागीरथी म्हणण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा-वाद सुरू आहेत. जातिभेद-धर्मभेद मिटवण्यासाठी याच राज्यात आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्नांचा पुरस्कार केला गेला. स्वतः डॉ. आंबेडकरांनी याचा पुरस्कार केला. त्याच राज्यात राज्याचे महिला व बालविकासमंत्री कधी गंभा, कधी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांवर बंदीची भाषा बोलताहेत. या प्रतिगामी सरकारने राज्यातील छत्रपती शिवरायांच्या धोरणांतून फुललेला शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार संपवायचा विडा उचलला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विधवा महिलांना आधीच अनेक कुचंबणांचा सामना करावा लागतो. सामाजिक परिस्थितीशी झगडा देत असताना त्यांना नवनवीन विशेषणं लावून त्यांची स्थिती बदलणार नाही. त्यांच्यासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी काम केले पाहिजे. कोविड काळात या विषयाकडे आम्ही गांभीर्याने पाहिलं आणि विविध योजनांचा लाभ त्यांना एकछत्री कसा मिळेल यासाठी उपक्रम राबवले. राज्याची माजी महिला व बालविकास मंत्री म्हणून मला वाटतं सरकारकडून अशा संवेदनशीलतेची अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Yashomati Thakur says I am not Ganga Bhagirathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.