...अन् अल्पवयीन बालिकेचा नियोजित विवाह यशोमती ठाकूर यांनी वेळीच रोखला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:51 PM2021-03-28T22:51:03+5:302021-03-28T23:03:25+5:30
Yashomati Thakur : बुलडाणा जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे लग्न लावण्यासाठी नियोजन करून गुजरात गाठण्यात आले होते.
अमरावती : चौदा वर्षाच्या बालिकेचा गुजरातमध्ये नियोजित विवाह महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने तत्पर कृती करून वेळीच रोखण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे लग्न लावण्यासाठी नियोजन करून गुजरात गाठण्यात आले होते. (Yashomati Thakur stopped the planned marriage of minor girl on time!)
गुजरातमधील जोलवा येथे हा विवाह होणार होता. याबाबत माहिती मिळताच महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था व बुलडाणा जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले व गुजरातमधील यंत्रणेलाही सूचित केले. याबाबत १०९८ हेल्पलाईनवरही तक्रार प्राप्त झाली होती. महिला व बाल विकास मंत्री यांच्या तत्काळ कार्यवाहीमुळे दोन्ही राज्यातील बाल संरक्षण यंत्रणा सक्रिय होऊन आज नियोजित असलेला बालविवाह थांबविण्यात यश आले आहे.
महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांनी गुजरात चाइल्ड लाईन आणि बाल संरक्षण कक्ष व जोलवा येथील बाल विवाह प्रतिबंध अधिकारी जोलवा यांच्या मदतीने गुजरात राज्यातील जोलवा, दहेज पोलिस स्टेशन अंतर्गत प्रत्यक्ष उपस्थित राहून ही बाल विवाह प्रतिबंध कार्यवाही करण्यात केली आहे.
बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालिकेच्या पुनर्वसनासाठी व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.