२७६४ रक्तजल नमुने तपासणीसाठी यवतमाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:53 PM2018-10-10T21:53:54+5:302018-10-10T21:54:13+5:30
आतापर्यंत महापालिका, जिल्हा परिषद ग्रामीण यंत्रणा व नगर परिषद क्षेत्रातील एकूण २७६४ डेंग्यूरुग्णांचे रक्तजल नमुने शासकीय यंत्रणेने घेऊन ते तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने ‘लोकमत’ला दिली आहे. यातील ७५ टक्के रक्तजल नमुने एकट्या अमरावती महापालिका क्षेत्रातील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आतापर्यंत महापालिका, जिल्हा परिषद ग्रामीण यंत्रणा व नगर परिषद क्षेत्रातील एकूण २७६४ डेंग्यूरुग्णांचे रक्तजल नमुने शासकीय यंत्रणेने घेऊन ते तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने ‘लोकमत’ला दिली आहे. यातील ७५ टक्के रक्तजल नमुने एकट्या अमरावती महापालिका क्षेत्रातील आहेत.
अमरावती जिल्ह्यात एकूण २२६ डेंग्यूरुग्ण असल्याचा अहवाल हा यवतमाळ सेंटिनल सेंटरने दिला होता. त्यापैकी महापालिका क्षेत्रात १९० रुग्ण आढळून आले होते. शहरातील अनेक नामांकित खासगी डॉक्टरांकडे हजारोे एनएस-वन पॉझिटिव्ह व इलायझा कन्फर्म रुग्णांची नोंद आहेत. पण, जोपर्यंत यवतमाळवरून रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोपर्यंत शासकीय यंत्रणा पॉझिटिव्ह रुग्ण मानायला तयार नाही. पण, २२६ रुग्ण पॉझिटिव्ह असणेसुद्धा मोठी बाब आहे. त्याचप्रमाणे २७६४ रक्तजल नमुने पाठविल्याचा अर्थ, डॉक्टरांकडून शासकीय आरोग्य यंत्रणेने सदर रक्तजल नमुने कलेक्ट केले, त्या रुग्णांवर सदर खासगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचा उपचार झाला आहे. मात्र, पहिल्या पाच दिवसांत डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली एनएस-वन चाचणी किट यवतमाळला अद्यापही उपलब्ध न झाल्याने या ठिकाणी फक्त आयजीएम, आयजीजी टेस्ट करण्यात येते. ही चाचणी आठ दिवसानंतर करावयाची असते. त्या कारणाने डेंग्यू पॉझिटिव्ह असतानाही अहवाल निगेटिव्ह आला आहे, अन्यथा यवतमाळ सेंटिनल सेंटरचा अहवाल हा दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा आतापर्यंत असता, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या रक्तजल नमुन्यांमध्ये महापालिका क्षेत्रातील २२१३, तर ग्रामीण भागातील ५५१ आहेत. त्या कारणाने शासकीय आरोग्य यंत्रणेने विशेषत: महापालिकेने प्रतिबंधक उपाय राबविणे गरजेचे झाले आहे.
स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह
स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजाराने अमरावती शहरातही पाय पसरविले असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत २७ संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी दोन रुग्णांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील १८ वर्षीय तरुणी व ४३ वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे. दोन्ही रुग्णांवर टॅमी फ्लूू गोळ्यांचा उपचार करण्यात आला असून, दोघांचीही प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.