यंदाच्या कृषी महोत्सवात मूळ उद्देशालाच हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 09:55 PM2018-03-20T21:55:34+5:302018-03-20T21:55:34+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्रगत कृषितंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या कृषी महोत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या अन् अर्धेअधिक स्टॉल रिकामे असताना कसा साधणार संवाद, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
प्रचार, प्रसाराअभावी तिसऱ्या दिवशीच महोत्सवाचे सूप वाजले अशी स्थिती होती. महोत्सवात बहुतांश स्टॉल कृषी क्षेत्राव्यतिरिक्त असल्याने जे थोडेबहुत शेतकरी महोत्सवात दाखल झाले, त्यांनीदेखील पाठ फिरविली. प्रतिसाद लाभत नसल्याने व स्टॉलचा खर्चदेखील निघणे कठीण झाल्याने महोत्सव संपण्याची वाट न पाहता अनेक स्टॉलधारकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले. यावेळी शासकीय विभागासाठी आरक्षित डोममध्ये ऐनवेळी साड्या, ज्वेलरी, कंझ्यूमर आदींचे स्टॉल लावण्यात आले. कार्यशाळा, परिसंवादात खुर्च्या रिकाम्याच राहिल्या, तर निमंत्रक अनुपस्थित राहिल्याने कार्यक्रमांचा बोजवारा उडाल्याचे वास्तव आहे. या महोत्सवस्थळी संरक्षणाचा अभाव होता. यासाठी टिनपत्र्यांचे कुंपण आवश्यक असताना प्रत्यक्षात ते दिसून आले नाही.
शासनाच्या कृषी महोत्सवाचा पहिल्यांदाच फ्लॉप शो
जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्यांपैकी पहिल्यांदाच यंदाचा कृषी महोत्सवाचा फ्लॉप शो झाला. आयोजनावरील २० लाखांना निधी निव्वळ वाया गेला. याला जबाबदार जिल्ह्याची ‘आत्मा’ यंत्रणा असल्याने शासनाची एकप्रकारे नाचक्की झाली. पालकमंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेतल्याने ढिसाळ आयोजनाबाबत कारवाई करणार काय, असा शेतकºयांचा सवाल आहे.