सत्तेची वर्षपूर्ती; आश्वासनांचा डब्बा गूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:02 AM2018-03-09T00:02:17+5:302018-03-09T00:02:17+5:30
‘स्वच्छ’ कारभाराचा नारा देऊन सत्तासोपान सर करणाºया भाजपची महापालिकेत गुरूवारी वर्षपूर्ती झाली. ८ मार्च २०१७ रोजी संजय नरवणे यांच्या रूपात भाजपचा स्वबळावरचा पहिलावहिला महापौर स्थानापन्न झाला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘स्वच्छ’ कारभाराचा नारा देऊन सत्तासोपान सर करणाºया भाजपची महापालिकेत गुरूवारी वर्षपूर्ती झाली. ८ मार्च २०१७ रोजी संजय नरवणे यांच्या रूपात भाजपचा स्वबळावरचा पहिलावहिला महापौर स्थानापन्न झाला. लगोलग सारीच महत्त्वपूर्ण पदे भाजपकडे आलीत. ८७ सदस्यीय सभागृहात भाजपचे ४५ सदस्य निवडून आलेत. संपूर्ण बहुमताच्या जोरावर भाजपने पारदर्शक कारभाराची हाक दिली. तथापि वर्षपूर्तीचे सिंहावलोकन केल्यास सत्तेची वर्षपूर्ती झाली खरी; मात्र आश्वासनांचा डब्बा गूल झाल्याची वस्तुस्थिती आहे.
महापालिकेतील गोल्डन गँगवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांना हद्दपार करून स्पष्ट बहुमत देण्याची साद भाजपने ‘मनीफॅस्टो’मधून घातली. अमरावतीच्या जनतेनेही भाजपला भरभरून मते देत त्यांचे ४५ सदस्य सभागृहात पाठविले. काँग्रेस-राष्टÑवादीच्या भ्रष्ट कारभाराने त्रस्त झालेल्या अमरावतीकरांना आपण विकास देऊ, पारदर्शक कारभार देवू, स्वच्छतेचा एकल कंत्राट देऊ, अशी हाकाटी पिटविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात वर्षभरानंतरही भाजपच्या सत्ताधिशांना सत्तेचा सूर गवसलेला नाही. महापालिकेची कधी नव्हे ती आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली. तथापि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भाजपार्इंनी महापालिकेला त्या विदारक परिस्थितीतून बाहेर काढले नाही. प्रशासनावर वचक राखू शकले नाही. विशिष्ट सदस्यांना गोल्डन गँग संबोधणाºया भाजपमध्येच एक नवी गँग तयार झाली. स्वच्छतेचा असो वा बांधकामाचा वा उद्यानाचा कंत्राट आपल्याकडेच राहावा, अशी धडपड अनुभवाास आली. वर्षभरात एकही नवीन काम सुरू न झाल्याने पहिल्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या सदस्यांमध्येही असंतोष उफाळला. शतप्रतिशत बहुमत असताना एक विकासकाम होत नसेल तर सत्तेला चाटायचे काय? असा संतप्त सवाल भाजपाईमधून व्यक्त होऊ लागला.
दुसºयांच्या सावलीत वावर
महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, सभागृह नेते, झोन सभापती, विषय समित्यांच्या सभापती ही सारीच महत्त्वपूर्ण पदे भाजपाईकडे आहेत. मात्र, वर्षभरानंतरही कुठलाच पदाधिकारी स्वतंत्र छाप सोडू शकला नाही. महापौर तर वर्षभर दुसºयांच्याच सावलीत वावरत असल्याचे दृष्टीपथास आले. वर्षभरात कुणीही ठळक असे काम पूर्णत्वास नेले नाही.
प्रकल्पपूर्ती केव्हा?
मोठा गाजावाजा करून घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता मूल्यांकन, एकल कंत्राट पे अॅण्ड पार्क असे प्रकल्प हाती घेण्यात आले. तथापि नरवणे यांच्या नेतृत्वातील सत्ताधीशांना ते पूर्णत्वास नेण्यात अपयश आले. जाहीरनाम्यात मोठमोठी आश्वासने देणाºया भाजपचा वर्षभरात डब्बा गूल झाला. मात्र, १३६ कोटी कुठे अडकलेला, याचे उत्तर सत्ताधिशांजवळही नाही.