यंदाही सार्वजनिक पोळा भरण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:29+5:302021-09-05T04:17:29+5:30
अमरावती : कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी कोरोना अद्याप गेलेला नाही. सणाच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका ...
अमरावती : कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी कोरोना अद्याप गेलेला नाही. सणाच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढू नये, यासाठी यंदाचा पोळा आणि तान्हा पोळा हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ३ सप्टेंबर रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य कोविड स्टाक फोर्सने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. अमरावती सर्व राज्यातील इतर जिल्ह्यातील डेंग्यू, डेल्टा फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून सोमवार ६ सप्टेंबर रोजी पोळा सण असून सुरक्षिततेचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी करीता महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्राकरीता मुख्याधिकारी तसेच ग्रामीण भागातील तहसीलदार यांनी त्यांचे स्तरावर करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
बॉक्स
मार्गदर्शक सूचना अशा
पोळा सण साजरा करताना तो प्रत्येकाने आप आपल्या घरी साजरा करावा. या सणााकरिता सामूहिकपणे एकत्र येऊन बैलजोडीचे पूजन करू नये.
नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करू नये
मास्क सॅनिटायझर या सुरक्षिततेच्या साधनांचा वापर करून सुरक्षित वावराचे पालन करा