समाजकल्याण वसतिगृहातील प्रवेश यंदा आॅफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 12:15 AM2016-06-10T00:15:08+5:302016-06-10T00:15:08+5:30
सामाजिक न्याय (समाज कल्याण) विभागाच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश यंदा आॅफलाईन होणार आहेत.
अमरावती : सामाजिक न्याय (समाज कल्याण) विभागाच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश यंदा आॅफलाईन होणार आहेत. मागील वर्षी हे प्रवेश आॅनलाईन केले होते. त्यात बराच वेळ खर्ची पडल्याने यंदा आॅफलाईन प्रवेश घेण्याचे आदेश समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. त्यामुळे समाजकल्याण आयुक्तांच्या सूचनेनुसार १ ते ३० जून या काळात ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अपंग, अनाथ व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणे सोयीचे व्हावे यासाठी विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे समाजकल्याण विभागाने सुरू केली आहेत. विभाग पातळीवर एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहासह जिल्हा व तालुका ठिकाणी शंभर ते अडीचशे विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृहे आहेत. वसतिगृहात गुणवत्तेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक, साहित्य व निर्वाह भत्ता आदी सुविधा मोफत देण्यात येतात. पूर्वी या वसतिगृहात आॅफलाईन प्रवेश देण्यात येत होते. वसतिगृहात व सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येत होती. काही ठिकाणी यात गोंधळ झाल्याने व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मागील वर्षी ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली. यात विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेऊन राज्यस्तरावरून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात आले. आॅनलाईन प्रक्रियेतील गुंतागुंत व अन्य कारणांमुळे मागील वर्षी या प्रवेशाला खूप वेळ लागला. विशेष म्हणून प्रवेशाचे अधिकार समाजकल्याण मंत्र्यांकडे असल्याने काही पालकांची अडचण झाली. त्यामुळे यंदा आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया न घेता पूर्वीप्रमाणेच आॅफलाईन प्रक्रिया घेण्याचे आदेश बगेले यांनी दिले आहेत. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना तसेच १ लाख रुपये उत्पन्न असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.