यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्या वक्तव्याचे पडसाद अमरावतीवर ! नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी.. जमाबंदीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:27 PM2024-10-05T13:27:14+5:302024-10-05T13:30:04+5:30
Amravati : उत्तर प्रदेशातील यती नरसिंह आनंद सरस्वती यांनी विशिष्ट धर्मा विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या जमाकडून पोलीस स्टेशन वर दगडफेक
मनीष तसरे:
अमरावती :गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दोन हजार लोकांचा जमाव नागपूर गेट पोलीस स्टेशनवर आलेला होता. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्यामुळे काही वेळात हा जमाव हिंसक झाला व अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर व हजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली, यात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे व पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झालेले आहे.
दोन ते अडीच हजार लोकांचा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना रात्री अखेर हवेत गोळीबार करून व अश्रुधुरांच्या नळकांड्यावर लाठीचार्ज करावा लागला. रात्री एक नंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये २१ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून पोलीस व्हॅनची तोडफोड झाली आहे. या परिसरात सध्या जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याचे आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.
अफवांना बळी पडू नये
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, "काही संघटनांचे लोक उत्तर प्रदेशातल्या यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन एकूण चारशे ते पाचशे लोक रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस स्टेशन मधील इन चार्ज यांनी त्यांना यासंबंधित एफआयआर पहिलेच आलेली असून कारवाई करण्याचं सांगितलं आणि त्यांना जायला सांगितलं. पण याविषयीचा व्हिडिओ वायरल करून जमाव गोळा केला आणि पोलिसांवर दगडफेक केली. त्यासंबंधी कारवाई करू, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये"