येवद्यातील डॉक्टरचा सिंदखेडनजीक अपघातात मृत्यू; तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:55 PM2023-04-22T12:55:46+5:302023-04-22T12:56:08+5:30
मुंबईत वास्तव्य, ईदसाठी गावी परतायचे स्वप्न अधुरे, आधीच घातला काळाने घाला
येवदा (अमरावती) : मुंबईला वास्तव्यास असलेल्या येवदा येथील प्रथितयश डॉक्टरचे रमजान ईद गावात साजरी करण्याचे स्वप्न अपघाताने हिरावले. सिंदखेडनजीक झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तर जखमी कुटुंबीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
डॉ. अब्दुल खालिक जमादार (५०) हे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा येवदा या मूळ गावी येण्यास आपल्या कुटुंबासमवेत मुंबईहून कारने निघाले होते. सिंदखेडराजानजीक पहाटे ५ वाजता त्यांच्या कारला कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले डॉ. अब्दुल खालिक जमादार त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगी मुस्कान (२२) हिची प्रकृती चिंताजनक आहे, तर पत्नी अमरीन अब्दुल खालिक जमादार (४६) व मुलगा अमन (१९) व चालक दिनेश कुमार (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, डॉ. अब्दुल खालिक जमादार यांच्या मृत्यूची वार्ता गावात धडकताच ईद साजरी करण्याकरिता वस्तूंची खरेदी थांबली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. मुंबईत ग्रामस्थांचा दुवा येवदा येथे शिक्षण घेऊन मुंबई गाठणारे हा अब्दुल खालिक सौदागर हे मुंबईत ग्रामस्थांकरिता दुवा होते.
जमिनीवरील कार्यकर्ता हिरावला
रमजान ईदसाठी दोन-तीन दिवसाचा वेळ काढून डॉ. अब्दुल खालिक सौदागर हे हमखास येत असत. त्यावेळी त्याच्या ठायी कुठलाही बडेजाव राहत नसे असे हे उमदे व्यक्तिमत्व काळाने हिरावल्याचे दु:ख येवदावासीयांना आहे.