सोयाबीनचे उत्पन्न एकरी दोन क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:00 AM2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:27+5:30
सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : मोठ्या कष्टाने व काळजीने चार महिन्यांपासून जोपासत असलेल्या सोयाबीन या नगदी पिकाने याही वर्षी सरासरी न साधल्याने व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाची एकरी दोन क्विंटल एवढीच सरासरी लागत असून, लागवडीचा खर्चही यामुळे निघाला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.
सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या गंज्या पावसाने भिजल्याने होते नव्हते सोयाबीनही खराब झाले. त्यामुळे त्यांना योग्य भाव मिळाला नाही. सोयाबीन, उडीद, मूग हे नगदी पीक समजले जात असल्याने याच पिकांवर शेतकºयांची दिवाळी साजरी होत होती. परंतु या नगदी पिकाने अपेक्षा भंग केल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीनसह सर्वच पिके चांगली होती. परंतु सततच्या पावसाने सुरुवातीला उडीद, मूग या पिकांसह सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तालुक्यात सरासरी ७० टक्क्यांच्यावर नुकसान झाले, त्याचा सर्व्हेही झाल्याचे शासनाने सांगितले. परंतु आता त्याची प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या पिकानंतर कापूस आणि तूर या पिकांवर उर्वरित शेतकºयांच्या अपेक्षा लागून आहेत.
विम्याची रक्कम त्वरित मिळावी
नगदी पैसे भरून विमा काढला. पीक वाया गेले. सोयोबीनची सरासरी पाहता अनेकांनी सोयाबीन काढलेच नाही. शासनाने सरसकट मदत तर केलीच पाहिजे, शिवाय सोयाबीन व इतर पिकांच्या विम्याची रक्कमही त्वरित मिळावी, यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.