मन:शांती, आरोग्य संवर्धनासाठी ‘योगा’
By admin | Published: June 21, 2015 12:38 AM2015-06-21T00:38:11+5:302015-06-21T00:38:11+5:30
भारत भूमिला महान तपस्वी लोकांची भूमी म्हणून ओळखले जाते. ‘योग’ हा या भारत भूमिला मिळालेला वारसा असून..
राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळावा : राष्ट्रसंतांनीही सांगितले योगाचे महत्त्व
अमरावती : भारत भूमिला महान तपस्वी लोकांची भूमी म्हणून ओळखले जाते. ‘योग’ हा या भारत भूमिला मिळालेला वारसा असून ती देशाची एक महत्वाची ठेव आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विविध रोगांनी ग्रासलेल्या मानवजातीला ‘करा योग रहा निरोग’ हा मंत्र अगदी संजीवनी समान आहे. शरीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त करुन देणारी ‘योग’ ही शक्ती मानवी आरोग्याला लागलेल्या रोगांच्या ग्रहणाला दूर सारु शकते. मानव शरीर पंचतत्वांनी बनलेले आहे. यामध्ये जल, वायू, पृथ्वी, अग्नी, आकाश या तत्वांचा समावेश आहे. या पंचतत्त्वांच्या संतुलनामुळेच हे शरीर हे स्वस्थ राहते.
अगदी मोजक्याच शब्दांत योगाचे महत्व सांगायचे झाले तर योग म्हणजे सुख, शांती, समाधानाने जगण्याची कला आहे. जीवनाला संयम आणि शिस्त लावणारे ते एक शास्त्र आहे. मानवामध्ये असलेली ईश्वरीय चेतना जागविण्याचा योगा व्यतिरीक्त दुसरा मार्ग नाही. त्यामुळेच संत आणि महापुरुषांनी योगाचा नेहमी पुरस्कारच केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत सुध्दा योगाच्या व व्यायामाच्या मानवी जीवनात असलेले महत्व अधोरेखीत करण्यात आले आहे. परदेशातही आजमितीस योगाचे महत्व पटले असून परदेशी नागरिक सद्यस्थितीत योगाचा शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करण्यावर भर देत आहेत. परदेशी नागरिकांचा योगाबद्दलचा ओढा केनिया, शेअल्स, श्रीलंका या देशांमध्ये अनुभवता आला. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा सातासमुद्रापार पोहोचविण्याचे कार्य भारतातील अनेक योग संस्थांनी केले आहे. त्यामध्ये जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा महत्त्वाचा वाटा आहे.
-अरुण खोडस्कर,
आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक.
बर्लिन आॅलिम्पिकमध्येही योग प्रात्यक्षिके
१९३६ साली बर्लिन आॅलिम्पिकमध्ये मंडळाच्या तीस व्यायामपटुंनी भारतीय व्यायाम पध्दतीची प्रात्यक्षिके सादर केली होती. त्यावेळी व्यायाम प्रकारासोबत योगासने, प्राणायाम, शुध्दिक्रिया, मल्लखांबावरील योगासने सादर करण्यात आली होती. अरूण खोडस्कर यांनादेखील ३५ वर्षांपूर्वी मंडळामार्फत परदेशात योगप्रचाराची संधी मिळाली आहे. १९८० साली जापान येथे आयोजित पहिल्या जागतिक ‘झेन याग’ संमेलनाला उपस्थित राहून शुध्दीक्रियांची प्रात्यक्षिके सादर करण्याकरिता हव्याप्र मंडळाच्या चमूला मंडळाने पाठविले होते. तेव्हापासून चीन, थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, नेपाळ, केनिया, मॉरीशस, श्रीलंका व शेसल्स या देशांमध्ये आयोजित योग संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली.
मन:शांती देणारे उत्तम साधन
योग हे मन:शांती देणारे उत्तम साधन आहे. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग हे मानवजातीला मिळालेले वरदान आहे. म्हणूनच हा योगदिवस दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायलाच हवा. संपूर्ण जगात जागतिक योगदिनाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतातील जवळपास ६५० जिल्ह्यात २१ मे पासून केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे १ महिना कालावधीची योग शिबिरे सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सुरु झाली आहेत.