योगेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरली 'खुन्नस'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:05 PM2019-02-15T23:05:21+5:302019-02-15T23:05:41+5:30
महाजनपुरा,माताखिडकी परिसरातील तरुणांमध्ये झालेल्या पूर्वीच्या वादातील खुन्नस योगेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. दोन तरुणांच्या गटातील तिरस्काराची भावना नेहमीच वादातीत राहिल्यामुळे या तरुणांच्या वर्चस्वाच्या लढाईत योगेशचा बळी गेल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाजनपुरा,माताखिडकी परिसरातील तरुणांमध्ये झालेल्या पूर्वीच्या वादातील खुन्नस योगेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. दोन तरुणांच्या गटातील तिरस्काराची भावना नेहमीच वादातीत राहिल्यामुळे या तरुणांच्या वर्चस्वाच्या लढाईत योगेशचा बळी गेल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
खोलापुरी गेट हद्दीतील महाजनपुरा, माताखिडकी, वल्लभनगर, गांधी आश्रम परिसरात नेहमीच गुन्हेगारी घटना घडतात. यामध्ये संवेदनशील परिसर म्हणून गणल्या जाणाऱ्या माताखिडकी व महाजनपुºयातील दोन गटांतील तरुणांचे अनेकदा वाद उफाळून आले आहेत. या वादातून एकमेकांवर प्राणघातक हल्लेसुद्धा झाले आहेत. अनेक वर्षांपासून दोन्ही परिसरातील काही तरुणांचे वेगवेगळे गट एकमेकांची खुन्नस वाढवित आहेत. समोरासमोर आल्याने त्यांच्यात अनेकदा भांडणे झालीत. परिसरातील काही सामान्य तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांच्या संपर्कात राहतात. त्यामुळे साधारण तरुणसुद्धा गुन्हेगारीच्या कचाट्यात भरडला जात आहे. योगेशचाही अशाच गटबाजीच्या वादात बळी गेल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. साधारण परिस्थितीत राहणारा योगेश मिळेल ते काम करायचा. बहुधा तो रंगकामात व्यस्त असायचा. मात्र गुन्हेगारीशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या योगेशला नाहक जीव गमवावा लागला. गुन्हेगारांसोबत योगेशचा संपर्क आल्यानेच दुसºया गटातील काही तरुणांमध्ये त्याच्याबद्दल खुन्नस वाढली होती. तो आपल्यावर वर्चस्व गाजवू शकेल याच भावनेतून माताखिडकीतील त्या आरोपी तरुणांनी त्याला एकट्यात गाठून संपविले असावे, असे प्राथमिक चौकशीत पोलिसांच्या निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुशीर आलम हत्याकांडातील आरोपींशी योगेशचा संबंध
साबणपुरा येथे घडलेल्या मुशिर आलम हत्याकांडातील आरोपींचा योगेश मित्र होता. सद्यस्थितीत मुशिर आलम हत्याकांतील आठवले बंधू कारागृहात आहे. मात्र या आरोपींची काही मित्रमंडळी बाहेर आहे. योगेश हा आठवले गँगचा सदस्य असल्याचाही हा जुना वाद असल्याची चर्चा परिसरात आहे.
जखमी अवस्थेत आणून टाकले कुणी?
चाकूच्या हल्ल्यानंतर जीव वाचविण्यासाठी योगेश रक्तबंबाळ अवस्थेत धावत सुटला. सराफा बाजार चौकात पडतझडत तो पुन्हा उठला आणि त्याने महाजनपुºयातील घर गाठले. त्यानंतर तो खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्याला कुणीतरी पोलीस ठाण्यात सोडून पलायन केल्याचे निदर्शनास आले. ती व्यक्ती कोण, याचाही शोध पोलीस घेत आहे.
खोलापुरी गेट हद्दीत गँगवार
खोलापुरी गेट हद्दीतील काही परिसरात गँगवार पेटले आहे. यापूर्वीही अनेक टोळक्यांमधील वाद उफाळून आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये अधूनमधून वाद होतात. माताखीडकी, महाजनपुरा, गांधी आश्रम, वल्लभनगर आदी परिसरात अवैध व्यावसायिकांचे प्रमाण अधिक असून, त्यातूनच गुन्हे घडत आहेत. मात्र, या गुन्हेगारीवर पोलिसांचे अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. या हत्येमागेही अवैध व्यवसायाचे मूळ असल्याची चर्चा असून, पोलिसांनाही संशय बळावला आहे.