तुम्ही करा राजकारण, आम्ही करतो रामचंद्राच्या नावाने समाजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 05:00 AM2022-05-18T05:00:00+5:302022-05-18T05:00:46+5:30
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे अभिषेक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, वस्त्रदान व अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशात सध्या रामाच्या नावाने राजकारण सुरू असताना, मात्र रामाच्या नावाने सुरू असलेली आमची संस्था समाजोपयोगी काम करीत आहे. माझ्या आजोबांचे नाव रामचंद्र आणि वडिलांचे नाव चंद्रकांत असून वडिलांनी ही आजोबांच्या नावाने संस्था सुरू केली. याच संस्थेच्या माध्यमातून पुष्पमाला अभियान करण्याची घोषणा मंगळवारी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली. वाढदिवसाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.
मनपा शाळेच्या विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी आर्थिक दुर्बल कुटुंबातील ज्या मुलीला सायकल पाहिजे त्यांच्यासाठी पुष्पमाला अभियानातून सायकल उपलब्ध केली जाईल. आमच्या श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्यावतीने पुष्पमाला अभियान राबविले जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘माणूस मोठा नसतो, पद मोठे असते आणि त्याहीपेक्षा काम गोड असते’ आणि “कार्यकर्त्यांसोबत राहिले पाहिजे” ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची शिकवण असल्याचे त्या म्हणाल्या.
माजी महापौर विलास इंगोले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, बबलू शेखावत, अनिल अग्रवाल, बंडू हिवसे, धीरज हिवसे, सुनीता भेले, माजी नगरसेवक अहमद खान, सुरेश रतावा, राजू भेले, गजानन राजगुरे, प्रमोद इंगोले आदी उपस्थित होते. त्यांची गूळतुला करून तेवढा गूळ गौरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आला. याप्रसंगी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त पजाय या लघुपटातील कलाकार रितेश हातागडे, नीकेश सोनटक्के, निर्माता सौरभ बोरडे तसेच विद्यापीठ युवा महोत्सव बासरी वादक रोहन खंडारे यांचा सत्कार करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त मुंबईत अभिषेक महाआरती
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे अभिषेक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, वस्त्रदान व अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.