तू माहेरी जा, तुझ्यासारख्या दहा बायका आणतो, विवाहितेचा छळ
By प्रदीप भाकरे | Published: August 17, 2023 01:32 PM2023-08-17T13:32:12+5:302023-08-17T13:33:31+5:30
धमकी देत विवाहितेला घराबाहेर काढले
अमरावती : तू माहेरी निघून जा, तुझ्यासारख्या दहा बायका मी आणतो, अशी धमकी देत एका विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. १४ मे २०२२ ते ७ फेब्रुवारीदरम्यान काैटुंबिक छळाची ती मालिका घडली. याप्रकरणी २४ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी आरोपी विजय निहारे (३६), विठ्ठल निहारे व एक महिला (सर्व रा. वर्धा) यांच्याविरूध्द कौटुंबिक छळ व हुंडाबंदी अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपी विजय हा मद्यपी असून, तो दारूच्या नशेत पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी आरोपी व सासूसासऱ्यांनी तिला माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगाला लावला. पैसे आण अन्यथा तू माहेरी निघून जा, तुझ्यासारख्या मी दहा बायका आणतो तू लवकर माहेरी निघून जा, असे म्हणून तिला मारहाण केली. यापुढे घरात दिसली तर मुडदा पडेल, अशी धमकी देत रात्री आठच्या सुमारास तिला घराबाहेर काढले. विवाहिता तेव्हाच माहेरी निघून आली.
ती माहेरी परतल्यानंतर आरोपी विजय हा तिला फोनवर शिवीगाळ करायचा. ७ फेब्रुवारी रोजी तो दारू पिऊन तिच्या माहेरी आला. त्यावेळी ती एकटीच घरी होती. तो तिच्या अंगावर मारायला धावला. त्यामुळे ती तिच्या मोठ्या आईच्या घरात जाऊन दडली. त्यावेळी शिव्या देत तो तेथून निघून गेला. त्यानंतरही त्याच्याकडून छळ सुरूच राहिला, त्यामुळे अखेर तिने पोलीस ठाणे गाठले.