युती केली तरच टिकाल नाहीतर जेलमध्ये जाल - प्रकाश आंबेडकर
By उज्वल भालेकर | Published: January 20, 2024 09:24 PM2024-01-20T21:24:47+5:302024-01-20T21:25:16+5:30
अमरावतीत वंचीत आघाडीची जाहीर सभा...
अमरावती: कॉँग्रेससह इतर सर्वच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मानगुटीवर कारवाईची तलवार लटकून आहे. त्यामुळे जर भीत-भीत निवडणुकीला सामोरे जाल तर सर्वांच्याच मानगुटीवर तलवार कोसळेल आणि सोनिया गांधीपासून सर्वच जेलमध्ये जातील. वंचितचा एकही नेता जेलमध्ये जाणार नाही. त्यामुळे युतीमध्ये लढाल तरच टिकाल नाहीतर सर्वच जेलमध्ये जाल अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी जाहीर सभेमध्ये व्यक्त केली.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमध्ये जाहीर सभेतून एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील सायन्सकौर मैदानावर ही विराट जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकरांना ऐकायला लाखोंच्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन वर्षापासून महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ जागा वाटपासंदर्भातील समजोता झालेला नाही. त्यामुळे खरच यांना बीजेपीला हरवायचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. ते म्हणतात वंचितला आम्ही दोन जागा देतो, त्यामुळे त्या जागा कोणत्या या संदर्भात जेव्हा कॉँग्रेसवाल्यांना विचारणा केली तर म्हणतात, अजून आमच ठरल नसल्याचे सांगतात. त्यामुळे जर बीजेपीला हरवायचा असेल तर युतीमध्ये तुम्हाला लढाव लागेल. वंचितला सोबत घेतल तर ठिक नाहीतर आम्ही सर्व ४८ जागाही लढवण्याचीही तयारी आहे. बीजेपीचा फक्त एककलमी कार्यक्रम सुरु असून त्यांना फक्त देशात एकच पक्ष ठेवायचा आहे.
देशात राजकीय पक्ष टिकले पाहिजे. राजकीय पक्षच राहिले नाही तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल. आम्ही कधीही सत्तेत नव्हतो. त्यामुळे चोरी करण्याचा प्रश्न नाही, जे सत्तेत होते त्यांनी चोरी केल्याचे मोदी सांगतात. त्यामुळे निवडणूका संपल्या सत्ता भोगणाऱ्यांना सर्वांनाच जेलमध्ये जावे लागेल. युती करायची नाही म्हणून ते बळीचा बकरा शोधत आहे. परंतु ज्या प्रकारे गरीब मराठ्यांचा उपयोग केला त्या प्रकारे वंचितचा वापर करण्याचा विचार असेल तर बीजेपी सोबत तुम्हालाही गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला.