चुकीच्या उपचारामुळे दगावला तरूण मुलगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:20+5:302021-03-06T04:13:20+5:30
दर्यापूर : डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने २२ वर्षीय दगावल्याप्रकरणी संबंधित डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी तक्रार मृत ...
दर्यापूर : डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने २२ वर्षीय दगावल्याप्रकरणी संबंधित डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी तक्रार मृत तरुणाच्या आईने दर्यापूर पोलिसांत शुक्रवारी नोंदविली. पंकज अंबादास चव्हाण (२२, रा. वसंतनगर, दर्यापूर) असे मृत मुलाचे नाव आहे.
तक्रारकर्त्या बेबी अंबादास चव्हाण (४३, वसंतनगर) यांच्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा २६ फेब्रुवारी रोजी आजारी झाल्याने सिव्हिल लाईन परिसरातील खासगी डॉक्टरकडे उपचारार्थ गेला होता. मुलाला पुन्हा ताप आल्याने २ मार्च रोजी पुन्हा तो त्याच डॉक्टरकडे तपासणीकरिता गेला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला सलाईन व त्यामध्ये दोन इंजेक्शन दिले. मुलाला थंडी वाजत असल्याने व मळमळ होत असल्याने डॉक्टरांनी पुन्हा दोन इंजेक्शन दिले. त्यानंतर डॉक्टरांनी मला बाहेरगावी जायचे आहे, तुम्ही याला दुसर्या डॉक्टरकडे घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर पंकजची प्रकृती बिघडत असल्याने त्याला अमरावती येथे हलवण्यात आले. अमरावती येथील खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी दर्यापूर येथील सदर डॉक्टरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याठिकाणी उपचारादरम्यान पंकजचा मृत्यू झाला, अशी तक्रार पंकज चव्हाणच्या आईने दर्यापूर पोलिसांत नोंदविली.
कोट :
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझा मुलगा दगावला. मी तशी तक्रार पोलिसांत दिली आहे. यावर लवकरात लवकर चौकशी करून डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करून संबंधित डॉक्टरचा परवाना रद्द करावा.
- बेबी चव्हाण,
तक्रारकर्त्या