आई-वडिलांसह तरुण मुलाला एकाचवेळी भडाग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 05:00 AM2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:50+5:30
रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक रुग्णवाहिका तीनही कलेवर घेऊन वरूडमध्ये पोहचताच नातेवाईकांसह शेजारी, आप्त मित्र परिवारातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला. काळबेंडे दाम्तत्याचे कलेवर सजविलेल्या ट्रॅक्टरवर, तर सोमेशचे पार्थिव शववाहिकेतून एकाचवेळी स्मशानघाटात नेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : मोर्शी-अमरावती मार्गावरील कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या काळबेंडे परिवारातील तिघांवर रविवारी दुपारी अंतिमसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी तीनही पार्थिवांना भडाग्नी देण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबासह, उपस्थितांचे डोळे पाणावले. शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात प्रभाकर काळबेंडे, त्यांच्या पत्नी राजमती व तरुण मुलगा सोमेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक रुग्णवाहिका तीनही कलेवर घेऊन वरूडमध्ये पोहचताच नातेवाईकांसह शेजारी, आप्त मित्र परिवारातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला. काळबेंडे दाम्तत्याचे कलेवर सजविलेल्या ट्रॅक्टरवर, तर सोमेशचे पार्थिव शववाहिकेतून एकाचवेळी स्मशानघाटात नेण्यात आले. त्यांच्यावर दुपारी ४.३० च्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले. तत्पूर्वी येथील गजानन नगर परिसरात घरी तीनही कलेवर पोहोचताच प्रभाकरराव यांच्या तीनही मुलींचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. डोड्यांदेखत आईवडील आणि एकुलता एक भाऊ गेल्याचे दु:ख त्यांना अनावर झाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेत प्रभाकर काळबेंडे आणि राजमती काळबेंडे हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. मुलगा सोमेश उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. अंत्ययात्रेत आमदार देवेंद्र भुयार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, माजी केंद्रीयमंत्री सुबोध मोहिते, माजी कृषि मंत्री अनिल बोंडे, पं.स. सभापती विक्रम ठाकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड, प्रहारचे ताुलकाध्यक्ष प्रणव कडूं आदी सहभागी झाले.
सोमेशचे मित्र हळहळले
सोमेश हा उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. विदर्भासह राज्याच्या विविध भागांत तो खेळायला जायचा. यामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग होता. त्याच्या अपघाती मृत्यूची वार्ता कळताच त्याचे अनेक मित्र शनिवारीच वरूडला पोहोचले. अनेकांनी अमरावती गाठून शवविच्छेदनासाठी मदत केली.
मुलींनी दिला खांदा, भडाग्नी
प्रभाकर काळबेंडे, राजमती काळबेंडे व सोमेश काळबेंडे यांच्या पार्थिवाला प्रभाकर काळबेंडे यांच्या अनिता चेडे (अमरावती), अमिता दोंदलकर (कुऱ्हा) व भावना गुहे (वाघोडा) या तीन मुलींनी खांदा व भडाग्नी दिला. गजानननगर परिसरात चुली पेटल्या नाहीत. श्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त सुरु असेलला भागवत सप्ताहसुद्धा रविवारी बंद ठेवण्यात आला.