तरुण दाम्पत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:02 AM2018-07-19T00:02:58+5:302018-07-19T00:03:22+5:30
येथून १६ किमी अंतरावरील वडगाव जिरे येथे तरुण दाम्पत्याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास एका घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या पूर्वाश्रमीच्या पतीने हा खून केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : येथून १६ किमी अंतरावरील वडगाव जिरे येथे तरुण दाम्पत्याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास एका घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या पूर्वाश्रमीच्या पतीने हा खून केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. त्याला अटक करण्यासाठी बडनेरा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
महेश डोंगरे (२५) व प्रियंका डोंगरे (२८) अशी मृतांची नावे आहेत. गजानन मारुती गजभिये (३२) असे आरोपीचे नाव आहे. वडगाव जिरे माहेर असलेल्या प्रियंकाने नांदगावपेठ नजीकच्या शेंदोळा पारधी बेडा येथील गजानन गजभिये याच्याशी १२ वर्षे संसार केला. यानंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगाव येथील महेश डोंगरे याच्याशी तिचे सूत जुळले आणि १५ दिवसांपूर्वीच त्यांनी लग्न केले. मंगळवारी महेश व प्रियंका वडगाव जिरे येथे आले होते. मात्र, तिची आजी अमरावती येथे आली होती. त्यामुळे एका खोलीच्या या घरात प्रियंका व महेश हेच होते.
दरम्यान, सायंकाळी ६ च्या सुमारास प्रियंका व महेश हे घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती बडनेरा पोलिसांना मिळताच ठाणेदार शरद कुळकर्णी यांच्या नेतृत्वातील पथकाने घटनास्थळ गाठले. घटनेचे गंभीरता पाहता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपायुक्त चिन्मय पंडित यांनीदेखील घटनास्थळ गाठले. बडनेरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. १२ वर्षांचा संसार मोडून प्रियंकाने महेशशी लग्न केल्याचा राग धरून गजाननने चाकूने वार करून दोघांना संपवले, अशी माहिती बडनेरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांनी दिली. बडनेरा पोलीस फरार गजाननचा शोध घेत आहेत.
तीनपैकी दोन मुले प्रियंकासोबत
गजाननसोबत १२ वर्षांच्या संसारात प्रियंकाला तीन मुले झाली. त्याच्यापासून विभक्त झाल्यानंतर एक मुलगा व मुलगी घेऊन प्रियंका बाहेर पडली होती, तर एक मुलगा गजाननजवळ होता. घटनेच्या वेळीदेखील ही मुले उपस्थित होती. ‘बाबा आले. त्यांनी आईला मारले’ अशी माहिती या मुलांकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.