एकतर्फी प्रेमातून तरुणीला कॉलेजात मारहाण, विनयभंग
By प्रदीप भाकरे | Published: August 24, 2023 12:59 PM2023-08-24T12:59:45+5:302023-08-24T13:00:15+5:30
दर्यापुरातील भयानक प्रकार, तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल
अमरावती : एक अल्पवयीन विद्यार्थीनी काॅलेजच्या कॅंटिनसमोर उभी असताना एका माथेफिरूने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दर्यापूर येथील एका कनिष्ट महाविद्यालयासमोर २२ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० ते २ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पिडिताच्या आईच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी आरोपी श्रेयस तायडे (१९,रा. आठवडी बाजार, दर्यापूर) याच्याविरूद्ध २३ ऑगस्ट रोजी विनयभंग, मारहाण व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. तथा त्याला तातडीने अटक करण्यात आली.
यातील अल्पवयीन मुलीचे आरोपी श्रेयससोबत एक वर्षापूर्वी प्रेम संबंध होते. ते तिच्या कुटुंबियांना माहिती झाल्याने तिच्या आईवडिलांना तिच्यासह आरोपीला देखील समजावून सांगितले. तेव्हापासून ती मुलगी आरोपीसोबत बोलत नव्हती. तरी देखील आरोपीतिचा वाईट उद्देशाने पाठलाग करत होता. तिला त्रास देत होता. त्यामुळे ती हतबल झाली होती. ती त्याला टाळण्यासाठी नेहमीच रस्ता बदलायची.
दरम्यान २२ ऑगस्ट रोजी ती कॉलेजला गेली असता दुपारी दिड ते दोनच्या सुमारास ती कॉलेज कॅंटिनसमोर उभी होती. तेव्हा आरोपी श्रेयस हा तेथे आला. कुणाचिही तमा न बाळगता तिला त्याने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्या माराने ती खाली कोसळली. आरडाओरड झाल्याने तिचे शिक्षक तेथे बोलावले. शिक्षकांनीच तिला दवाखान्यात नेले. तेथे उपचार घेत असताना दर्यापूर पोलिसांनी रुग्णालय गाठून तिचे बयान नोंदविले. तर दुसरीकडे दर्यापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.