अल्पवयीन ‘ती’ला घेऊन त्याची पुणे, पिंपरीला भटकंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:51 PM2021-11-26T17:51:05+5:302021-11-26T17:57:28+5:30
अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा शिरी घेतलेल्या ‘त्याच्या’विरुद्ध आता बलात्काराचा गुन्हा पोस्कोसह दाखल करण्यात आला.
अमरावती : तो विशीतला. अद्याप मिसरुडही न फुटलेला, मात्र प्रेमात पडला. बुडाला. ‘जिना सिर्फ तेरे लिए’च्या आणाभाकाही घेतल्या गेल्या. पण आपल्या प्रेमाला कुटुंबीय होकार देणार नाहीत, लग्नासाठी तर वर्ष-दोन वर्षं थांबावे देखील लागेल. मग काय, प्रेमात आकंठ बुडालेल्या त्याने तिला घेऊन अमरावतीहून पळ काढला.
पार पुणे, पिंपरीला जाऊन भटकंती केली. पण हाय रे, दोघेही १७ दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागले. पैकी प्रियकर गजाआड गेला. तर तिची रवानगी बालसुरक्षागृहात करण्यात आली. तिला पळवून नेण्याच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा शिरी घेतलेल्या ‘त्याच्या’विरुद्ध आता बलात्काराचा गुन्हा पोस्कोसह दाखल करण्यात आला.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ‘ही छोटीसी लव्हस्टोरी’. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कलम ३६३ ला आता ३७६ व पोस्कोचे कलम देखील जोडण्यात आले. ती देखील अल्पवयीन निघाली. दरम्यान, त्यांना आश्रय देणारा देखील दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. साहिल मुकेश लोहारे (२०, बेलपुरा) असे मुख्य आरोपीचे, तर त्यांना आश्रय व मार्गदर्शन करणाऱ्याचे नाव विशाल मुकेश लोहारे (बेलपुरा) असे आहे. ८ ते २५ नोव्हेंबरदरम्यान येथून पळालेले ते प्रेमीयुगुल पुणे, पिंपरी व लगतच्या जिल्ह्यात कामासाठी भटकंती करीत असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले.
काय आहे प्रकरण?
याप्रकरणी मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३५ च्या सुमारास साहिल मुकेश लोहारे (२०, रा. बेलपुरा) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ च्या सुमारास शौचास जाते म्हणून घराबाहेर पडलेल्या आपल्या मुलीला साहिल लोहारे याने पळवून नेले असावे, अशी तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार, राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला होता. तपासादरम्यान ती मुलगी अंडर-१८ निघाली. दरम्यान, साहिल व विशाल या दोघांना अटक करून त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली.
वारंवार बदलले मोबाईल लोकेशन
साहिल हा मुलीला घेऊन पुण्याला भटकला. मात्र, तेथे हाताला काम न मिळाल्याने ते दोन दिवसांपूर्वी अमरावतीला परतले. येथे विशाल सहारे याने त्यांना मदतीचे आश्वासन दिले. त्या दोघांना घेऊन तो सीपी कार्यालयासह गाडगेनगर ठाण्यातही पोहोचला. दोघांनीही लग्न केल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, ती माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार मनीष ठाकरे व ‘टीम राजापेठ’ने त्यांचे लोकेशन मिळविले. मात्र, ते वारंवार बदलत राहिले. अखेर २५ रोजी रात्री १.३० च्या सुमारास विशालला ताब्यात घेण्यात आले. खाकीचा प्रसाद मिळाल्यानंतर गुन्ह्याची कबुली देण्यात आली. त्याच्या माहितीवरून साहिल व मुलीला देखील त्वरेने ताब्यात घेण्यात आले.