मेमू ट्रेनच्या डब्यात तरुणाने घेतली फाशी; चिट्ठीतून समोर आले कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 04:56 PM2022-02-12T16:56:57+5:302022-02-12T17:04:52+5:30
बडनेरा ते नरखेड मेमू ट्रेन रात्री बडनेरा रेल्वे स्थानकावर मुक्कामी थांबते. याच ट्रेनच्या एका डब्यात योगेश स्वतःच्या शर्टाने साखळीला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना सापडला.
अमरावती : बडनेरा येथील रेल्वे स्थानकावर रात्री मुक्कामी थांबणाऱ्या मेमू ट्रेनच्या डब्यामध्ये २३ वर्षीय तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आली. या तरुणाजवळ तोडक्या-मोडक्या इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठ्ठी रेल्वे पोलिसांना सापडली.
योगेश घनश्याम कोरताम (२३, रा. कंपासपुरा, बडनेरा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बडनेरा ते नरखेड मेमू ट्रेन रात्री बडनेरा रेल्वे स्थानकावर मुक्कामी थांबते. याच ट्रेनच्या एका डब्यात योगेश स्वतःच्या शर्टाने साखळीला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना सापडला. त्याच्याकडे इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठ्ठी सापडली.
स्वमर्जीने आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. काही लोकांचे पैसे देणे असल्याचाही उल्लेख या चिठ्ठीत आहे. रेल्वे पोलिसांकडील सीसीटीव्ही फुटेजमध्ये योगेश रात्री साडेदहाच्या सुमारास ब्रीजवर असल्याचे दिसून आले.
रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे अधिक तपास करत आहेत. दोन वर्षांपूर्वी योगेशच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती.