इन्स्टावर ओळख झाली अन् तो मागेच लागला; जबरदस्तीने शिरला घरात, अल्पवयीन मुलीला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 04:34 PM2022-06-09T16:34:57+5:302022-06-09T16:41:04+5:30
तिला त्याने रस्त्यात येता-जाता अडविले तसेच ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मी म्हणतो तशी रहा, माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्या घरी येऊन तमाशा करीन,’ अशी धमकी तिला दिली.
अमरावती : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याशी आल्याचा प्रकार येथील एका नागरी वसाहतीत घडला. तिला थेट लग्न कर, अन्यथा घरी येऊन तमाशा करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी ८ जून रोजी दुपारी आरोपी ओम गजानन मिटकरी (२१, रा. जलारामनगर, अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंग, धमकी व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, पीडित मुलीचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. त्यावर आरोपीने मार्च २०२१ मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तिने ती ॲक्सेप्ट केल्यानंतर दोघांमध्ये मैत्रीदेखील झाली. तो इन्स्टावर तिच्याशी चॅट करू लागला. दहा ते बारा दिवसांनंतर आरोपी हा मुलीच्या घरात शिरला. पीडितेने त्याला कशासाठी आला, अशी विचारणा केली असता ‘सहज भेटायला आलो,’ असे म्हणून तो निघून गेला. त्याच वेळी ‘घरी येऊ नकोस,’ असे तिने त्याला बजावले. मात्र, पुढील दोन दिवसांतच तो पीडित मुलीच्या घरी आला. एक-दोन तास थांबलादेखील.
ही बाब पीडितेने आप्तांना सांगितली. त्या वेळी मुलीच्या नातेवाइकाने आरोपी ओम मिटकरीला समजावले. मात्र, तो बधला नाही. त्याने वारंवार मुलीचा पाठलाग चालविला. तिला त्याने रस्त्यात येता-जाता अडविले तसेच ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मी म्हणतो तशी रहा, माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्या घरी येऊन तमाशा करीन,’ अशी धमकी तिला दिली. त्यापुढे जाऊन आरोपीने ‘शाळेमध्ये येऊन भांडण करीन, तुझ्या नातेवाइकांना मारून टाकीन,’ अशा धमक्या दिल्याचे पीडितेने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मित्रमैत्रिणी, नातेवाइकांना धमकावले
आरोपीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाइकांचे मोबाईल नंबर मिळविले तथा त्यांना फोन करून शिवीगाळ व धमकावल्याचेही पीडितेने म्हटले आहे. पाठलागाचा कळस म्हणजे, आरोपीने ३० मे रोजी मध्यरात्री एक वाजता पीडितेला फोन कॉल केला. माझ्याशी फ्रेंडशिप का करीत नाहीस, माझ्याशी बोल, अन्यथा मी काही पण करीन, अशी गर्भित धमकी दिली. १ मे २०२१ ते ३० मे २०२२ या कालावधीत आरोपीने तिचे जिणे मुश्किल केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम करीत आहेत.