अंबिकानगरात तरुणाची चाकूने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:00 AM2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:29+5:30

सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अंबिकानगरातील महापालिका शाळा क्रमांक १६ च्या आवारात ही घटना घडली. पंकज रमेश गोहिल (२४, रा. हॉटेल सम्राट गल्ली, सतिधाम मार्केट) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणाचा फ्रेजरपुरा पोलिसांनी १५ तासांत छडा लावून तिन्ही आरोपींना अटक केली.

A young man was stabbed to death with a knife in Ambikanagar | अंबिकानगरात तरुणाची चाकूने भोसकून हत्या

अंबिकानगरात तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दारू पित बसलेल्या मित्रांची मस्करी करण्याच्या उद्देशाने त्यांना केलेली शिवीगाळ एका युवकाचा बळी घेऊन गेली. तीन जणांनी चाकूने भोसकून त्याची निर्घृण हत्या केली. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अंबिकानगरातील महापालिका शाळा क्रमांक १६ च्या आवारात ही घटना घडली. पंकज रमेश गोहिल (२४, रा. हॉटेल सम्राट गल्ली, सतिधाम मार्केट) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणाचा फ्रेजरपुरा पोलिसांनी १५ तासांत छडा लावून तिन्ही आरोपींना अटक केली.
पोलीस सूत्रानुसार, आकाश महेंद्र वासनिक (२२, रा. कंवरनगर), सुमीत प्रमोद स्थूल (२०, रा. बेनोडा) व सुरेश वसंतराव पाटील (२३, रा. यशोदानगर) अशी आरोपींची नावे आहेत.
अंबिकानगरातील शाळेच्या खुल्या जागेतील निवांत ठिकाणी आकाश, सुमीत व सुरेश सोमवारी रात्री मद्यपान करीत होते. रात्री १० वाजताच्या सुमारास पंकज गोहिल अमली पदार्थ सेवनाच्या उद्देशाने एमएच २७ एझेड ८२५९ क्रमांकाच्या दुचाकीने तेथे पोहोचला. तिघेही दारू पित बसल्याचे पाहून पंकजने त्याचा मित्र सुरेशची मस्करी करण्याच्या उद्देशाने अश्लील शिवीगाळ केली. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. हा प्रकार पाहून आकाश व सुमीतदेखील त्यांच्याकडे धावले. सुमीतने पंकजवर त्याच्याजवळील चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात पंकजच्या छातीवर डाव्या बाजूस व जांघेवर चाकूचे वार लागल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. त्यानंतर आकाश, सुमीत व सुरेश या तिघांनीही त्यांच्या एमएच २७- २२५६ क्रमांकाच्या दुचाकीने पलायन केले. काही वेळानंतर या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताच्या नातेवाइकांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावण्यात आले. ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी पंकजचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. डॉक्टरांनी पंकजला मृत घोषित केले.
फ्रेजरपुरा पोलिसांनी परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी सुरू केली असता, तीन ते चार जण पळताना त्यामध्ये आढळून आले होते. त्यानुसार पोलिसांनी खबऱ्यांकडून माहिती काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान आरोपींची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी मंगळवारी दुपारी तिन्ही आरोपींना अटक केली. या घटनेची तक्रार पंकजचे वडील रमेश धनजीभाई गोहिल (४९) यांनी फ्रेजरपुरा नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. यावर्षात २५ हत्येच्या घटना घडल्या आहेत. ही २६ वी हत्या शहरात झाली.

तपासकार्यात पोलिसांनी रात्र काढली जागून
सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही हत्येची घटना उघडकीस आली. त्यानुसार पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुºयाचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, एएसआय सुरेंद्र ढोके, प्रकाश राठोड, पोलीस हवालदार विजय बहादुरे, सागर बजगवरे, अनूप झगडे, वचन पंडित, विजय राऊत, सागर पंडित यांनी रात्री परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी सुरू केली. खबºयांंकडून माहिती काढण्यास सुरुवात केली. रात्रभर पोलिसांचे सर्च आॅपरेशन चालले. यानंतर मंगळवारी सकाळी आरोपींची नावे पुढे आली. पोलिसांनी आरोपींना मनकर्णानगरातून अटक करण्यात यश मिळविले.

 

Web Title: A young man was stabbed to death with a knife in Ambikanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून