आरी पोटात घुसून आतडे बाहेर पडलेल्या युवकाला यशस्वी शस्त्रक्रियेने मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:08 AM2021-03-29T04:08:22+5:302021-03-29T04:08:22+5:30

आतड्यांवरील गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयात यशस्वी अमरावती जिल्हा रूग्णालयाच्या पथकाची कामगिरी अमरावती : सेंट्रिगचे काम करत असताना ...

A young man who had a saw inserted into his stomach and had his bowel removed was saved by a successful surgery | आरी पोटात घुसून आतडे बाहेर पडलेल्या युवकाला यशस्वी शस्त्रक्रियेने मिळाले जीवदान

आरी पोटात घुसून आतडे बाहेर पडलेल्या युवकाला यशस्वी शस्त्रक्रियेने मिळाले जीवदान

Next

आतड्यांवरील गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयात यशस्वी

अमरावती जिल्हा रूग्णालयाच्या पथकाची कामगिरी

अमरावती : सेंट्रिगचे काम करत असताना अपघाताने एका युवकाच्या पोटात आरी घुसून त्याची आतडी बाहेर पडली. त्या गंभीर अवस्थेत त्याला इर्विन रूग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रूग्णालयाच्या पथकाने तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू करत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामुळे या युवकाला जीवनदान मिळाले असून, तो सुखरूप आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयातील सर्जन डॉ. संतोष राऊत यांच्या पथकाने आतड्यांवरील गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असून, हे दोन्ही रुग्ण सुखरूप आहेत.

पोटात आरी घुसल्याने मोर्शीहून इर्विनमध्ये हलविले

मोर्शीच्या रामजीनगरातील रहिवाशी अजय भलावी हा साधारणत: पंचवीस वर्षाचा युवक आहे. तो दि. 19 मार्चला सेंट्रिगचे काम करत होता. त्यावेळी आरी चालवत असताना अचानक त्याच्या डोळ्यात कचरा गेला व तत्क्षणी अपघाताने आरी त्याच्या पोटात घुसून त्याची आतडी बाहेर पडली. अत्यंत गंभीर अवस्था होती. मात्र, त्याचे नातेवाईक व परिचितांनी हिंमत ठेवून अजिबात वेळ न दवडता त्याला मोर्शी येथील डॉक्टरांकडे नेले. तेथील डॉक्टरांनी ही अवस्था पाहून त्याला अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अजयला तत्काळ अमरावतीला आणून इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इर्विन रुग्णालयातील वॉर्ड क्र. 16 येथील शल्यचिकित्सा विभागात अजय दाखल होताच तेथील तज्ज्ञ डॉ. संतोष राऊत यांनी स्थिती लक्षात घेऊन तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला व अजयला ऑपरेशन थिएटरमध्ये हलविण्यात आले. उत्तम टीमवर्क ठेवत तज्ज्ञांच्या पथकाने यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर त्याला आवश्यक औषधोपचार देण्यात आले. अजयची प्रकृती आता सुधारली आहे. इर्विन येथील पथकाने तातडीचे उपचार मिळवून दिले व यशस्वी शस्त्रक्रिया केली. जिल्हा रुग्णालयातील पथकाचे सहकार्य व उपचार सुविधेमुळे आपल्याला नवा जन्म मिळाला, अशी प्रतिक्रिया अजयने व्यक्त केली. अजय यांच्या पोटातील आतडे बाहेर पडले होते. लहान आतड्यावरही मार होता. इर्मजन्सी ओळखून वेळेत उपचार केल्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

पुण्यातील दवाखान्यात पैसे गेले; इलाज इर्विनमध्ये झाला

दरम्यान, 20 मार्चला इर्विनच्या शल्यचिकित्सा विभागात पोटाची आतडी फाटलेल्या एका युवकावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पूर्ण झाली. पंकज कदम हे अकोला जिल्ह्यातील मोहोड या गावाचे रहिवाशी असून, ते काही वर्षांपासून पुण्यात राहतात. पुण्यात एके दिवशी लिव्हरवर सूज आल्याने श्री. कदम यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखणे कमी झाले नाही. पुण्यात त्यांनी तीन रूग्णालयात उपचार घेतला. एक लाख 10 हजार रुपये खर्च झाला. मात्र, फारसा उपयोग झाला नाही.

पंकज कदम यांची बहिण अमरावती जिल्ह्यात निमदरी येथे राहतात. त्यांनी अमरावतीला इर्विनमध्ये चांगले उपचार मिळत असल्याने तिथे दाखल होण्याचे सुचविले. त्यानुसार पंकज यांना 20 मार्चला दाखल करण्यात आले. पंकज यांची पोटाची आतडी फाटलेली व जठराला नुकसान झाल्याचे डॉ. राऊत यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पंकज यांच्यावरही यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, ते सुखरूप आहेत. इर्विनमध्ये योग्य उपचार मिळून जीवदान मिळाल्याबद्दल पंकज यांनी इर्विन टीमप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

अनेकदा अकोल्याहून रुग्ण रेफर होतात : सीएस डॉ. श्यामसुंदर निकम

जिल्हा सामान्य रुग्णालयात 400 खाटांपैकी सर्जिकल सेवेच्या 130 खाटा आहेत. अनेक किचकट शस्त्रक्रिया इर्विनमध्ये होतात. साधारणत: दिवसाला तीन ते चार ऑपरेशन होतात. बरेचदा अकोल्याहूनही रुग्ण येथे रेफर केले जातात. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया विनामूल्य होतात. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठीच्या, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना व इतर योजनांचा लाभ दिला जातो. थॅलॅसिमिया, सिकलसेल आदी रक्तांशी संबंधित आजारांवरही उपचार उपलब्ध आहेत. बाहेर महागडी मिळणारी अनेक दर्जेदार औषधे येथे विनामूल्य उपलब्ध करुन दिली जातात, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.

न्यूरो सर्जन आले, आता सर्जरीही होतील

आता न्यूरो सर्जन डॉ. अभिजित बेले हेही इर्विनमध्ये रुजू झाले आहेत. न्यूरो सर्जरीची सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने प्रयत्नरत असल्याचेही डॉ. निकम यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे हेही यावेळी उपस्थित होते.

Web Title: A young man who had a saw inserted into his stomach and had his bowel removed was saved by a successful surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.