युवकांनी सोशल मीडियापेक्षा आपली कला वृद्धिंगत करावी - सुनील केदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 11:26 AM2022-04-23T11:26:39+5:302022-04-23T11:29:37+5:30
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अमरावती : युवा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. मानवी संसाधने आपल्या देशात अधिक आहेत. युवकांचा आय.क्यू. जुन्या पिढीपेक्षा अधिक आहे, असे असताना आमचे युवक सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करीत असून, त्यावर मर्यादा घालून आपल्यातील कला वृद्धिंगत कराव्यात, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी येथे केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. भारताचा विकास नवीन पिढीच्या खांद्यावर आहे. तंत्रज्ञानाने भारतात क्रांती केली असून, त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या देशात होत आहे. विद्यापीठ स्तरावर टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा, याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातील, असे केदार म्हणाले.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी विद्यापीठातून दरवर्षी एक लाख विद्यार्थ्याांपैकी ४० हजार विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात आणि ६० हजार विद्यार्थ्यांना पदवी मिळत नाही. ६० हजारांचा आकडा कमी होण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सी.बी.सी.एस.) पद्धत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी केले. यावेळी मागील वर्षी शासकीय विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेने उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तेथील डॉ. सुधीर मोहोड व डॉ. विनोद गावंडे यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन ना. केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले, तर आभार डॉ. संजीव ईश्वरकर यांनी मानले.