बुडणा-या मुलाला वाचविताना बुडाला तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 07:21 PM2017-09-06T19:21:43+5:302017-09-06T19:22:05+5:30
गणपतीचे विसर्जन करण्याकरिता मेधा नदीवर गेलेला एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी शिरजगाव कसबा येथे उघडकीस आली.
शिरजगाव कसबा (अमरावती), दि. 6 - गणपतीचे विसर्जन करण्याकरिता मेधा नदीवर गेलेला एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी शिरजगाव कसबा येथे उघडकीस आली. विशाल किशोर सातपुते (२४) असे मृताचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्याने एका लहान मुलाला डोहात बुडताना वाचविले होते.
प्राप्त माहितीनुसार, घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी विशाल त्याच्या सोबत रोहित विजय गोरडे नामक लहान मुलाला घेऊन गेला होता. विसर्जनानंतर पाण्यात बुडालेले गडू काढण्यासाठी रोहित पाण्यात उतरला. पाणी खोल असल्याने तो बुडू लागल्याने विशाल सातपुतेने त्याला पाण्याबाहेर काढले. परंतु हा डोह खोल असल्यामुळे त्याला श्वास धरून ठेवता आला नाही. यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.
विशाल स्वत: एलआयसीचे काम करून आठवडी बाजारात भाजीपाल्याचा व्यवसाय करीत होता. बहिणीचे लग्न करण्यासाठी तो इतर कामे करून शिक्षणही घेत होता. विसर्जनासाठी पोलिसांनी स्थळ निश्चित न केल्याने ही घटना घडल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.