संजय राऊतांविरुद्ध युवा स्वाभिमान आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 05:00 AM2022-04-27T05:00:00+5:302022-04-27T05:00:56+5:30
खा. राणा यांच्या वतीने देण्यात आलेल्या या दोन पानी निवेदनात २०१४ पासूनच्या लोकसभा निवडणुकीपासूनचे वेगवेगळे संदर्भ देण्यात आले आहेत. आपण मागासवर्गीय असल्यामुळेच मुद्दामहून आपल्याला शिवसैनिक खोट्या केसेस करून टोमणे मारत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना आम्हा दाम्पत्याला वारंवार बंटी-बबली, ४२० संबोधून आमची समाजात बदनामी केल्याचे या तक्रारवजा निवेदनात खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आपण मागासवर्गीय असल्यामुळे आपल्याला मुद्दामहून हिणवली जाणारी भाषा वापरली जाते, असा गंभीर आरोप करून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ॲट्रॉसिटी लावण्याची मागणी निवेदनातून केली आहे. खा. राणा यांच्या वतीने त्यांचे खासगी स्वीय सहायक विनोद गुहे यांनी हे निवेदन नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मंगळवारी दिले.
खा. राणा यांच्या वतीने देण्यात आलेल्या या दोन पानी निवेदनात २०१४ पासूनच्या लोकसभा निवडणुकीपासूनचे वेगवेगळे संदर्भ देण्यात आले आहेत. आपण मागासवर्गीय असल्यामुळेच मुद्दामहून आपल्याला शिवसैनिक खोट्या केसेस करून टोमणे मारत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना आम्हा दाम्पत्याला वारंवार बंटी-बबली, ४२० संबोधून आमची समाजात बदनामी केल्याचे या तक्रारवजा निवेदनात खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
मुंबईतील खारमधील निवासस्थानावर शिवसैनिक पाठवून घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्याचे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. मला व माझ्या पतीला २० फुट गाडण्याची भाषाही राऊत यांनी वापरल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनासोबतच गुहे यांनी पोलीस आयुक्तांना पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्हही दिला आहे. राणा यांच्या वतीने देण्यात आलेले हे निवेदन पोलीस आयुक्तांनी स्वीकारले.
खासदार नवनीत राणा यांच्यावतीने युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, विनोद गुहे, सचिन भेंडे, ॲड. दीप मिश्रा यांनी निवेदन दिले.
अमरावतीत खोदला खड्डा; केले नामकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणाऱ्या आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना २० फूट खड्ड्यात गाडण्याची भाषा गत दोन दिवसांपूर्वी केली होती. या वक्तव्याचा युवा स्वाभिमान पार्टीने मंगळवारी संजय राऊत यांच्यासाठी खड्डा खोदून निषेध व्यक्त केला. राणांच्या निवासस्थान परिसर असलेल्या शंकरनगरात खड्डा खोदण्यात आला, हे विशेष.
युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नीळकंठ कात्रे यांच्या हस्ते खड्ड्याचे विधिवत पूजन करण्यात आले. खड्ड्यात गाडणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसून खड्ड्यात असणाऱ्याला बाहेर काढणे ही संस्कृती आहे, असा आक्षेप कात्रे यांनी केला. स्मशानात गोवऱ्या तयार ठेवा म्हणणाऱ्या संजय राऊत यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शब्दबाण गृहउद्योगद्वारा संजय गौरी निर्माण करून त्यांच्या मागणीनुसार या गोवऱ्या या मुंबईत पाठवणार येणार असल्याचे युवा स्वाभिमान महिला आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आले.
हनुमान चालीसा पठण करणेे म्हणजे राजद्रोह असल्याचे महाविकास आघाडी सरकारने सिद्ध केले आहे. आता सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येत असल्याचेही युवा स्वाभिमान पार्टीने स्पष्ट केले. यावेळी राणा दाम्पत्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, जयंतराव वानखडे, महिला शहराध्यक्ष सुमती ढोके, सचिन भेंडे, विनोद गुहे, जया तेलखेडे, बाळू इंगोले, अजय जयस्वाल, सुरेश खत्री, चंदू जावरे, मंगेश चव्हाण, गौतम हिरे, भूषण पाटणे, किशोर पिवाल, सुरेश खत्री, वैभव बजाज, महेश मुलचदांनी, शुभम कराळे, नितीन तायडे, अनिल मिश्रा, प्रशांत कावरे, सत्येंद्र सिंग लोटा, खुशाल गोंडाणे आदी उपस्थित होते.