केळी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडून तरुणीचा मृत्यू; अमरावती जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:00 AM2019-09-28T06:00:00+5:302019-09-28T06:00:19+5:30
अमरावती जिल्ह्यात केळी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केळी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडकीस आले. कांचन जगन्नाथ अघम (२१, रा. मोहगव्हाण-झोडगा, ता. कारंजा लाड, जि. वाशीम) असे मृताचे नाव आहे. केळीचा अंश घशात अडकून तिचा मृत्यू झाला असावा किंवा फूड पॉयझन झाले असावे, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.
मोहगव्हाण येथील अघम कुटुंबीयांनी बाजारातून केळी घरी आणली होती. कांचन अघम, तिचा भाऊ व आई-वडील अशा चौघांनीही शुक्रवारी सकाळी केळी खाल्ली. कांचन हिने अर्धेच केळ खाल्ले. त्यानंतर १५ मिनिटांनी तिला अस्वस्थ वाटू लागले. मळमळ होऊ लागली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला तात्काळ कारंजा लाड येथील खासगी डॉक्टरकडे नेले. तेथून तिला तेथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आला. मात्र, प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून कांचनला अमरावती येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. तेथून तिला दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. डॉक्टरांनी तपासणीनंतर कांचनला मृत घोषित केले. या घटनेबद्दल मृताच्या नातेवाइकांना माहिती विचारली असता, कांचनने केळ खाल्यानंतरच तिची प्रकृती बिघडल्याचे सांगितले.
अर्ध्या तासाने भावालाही मळमळ
कांचनसोबत तिचा भाऊ अभिषेक यानेही सकाळी केळी खाल्ली होती. प्रथम कांचनची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. यादरम्यान अभिषेकलाही मळमळ होऊ लागली. त्यालाही कारंजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केळी खातानाच बोलल्यास ते घश्यात अडकण्याची शक्यता असते. कांचन अघमच्या घशात केळ अडकून तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. मात्र, शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचे निश्चित कारण कळू शकेल.
- एस. आय. थोरात, कॅज्युअल्टी वैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय.