पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणीने संपविली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:43+5:30
मॉलच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर अप अँड अबाऊ हे आलीशान हॉटेल आहे. तेथील सुरक्षा तोकडी मात्र असल्याचे या घटनेने स्पष्ट केले. शनिवारी सकाळी हॉटेल उघडण्याच्या बेतात असताना रूपाली लिफ्टने पाचव्या मजल्यावर आली आणि टेरेसकडे गेल्याची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. त्यानंतर तिने टेरेसच्या भिंतीवर चढून उडी घेतली. ही बाब मॉलच्या खाली उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनीही पाहिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अभियांत्रिकीचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. आता एमबीएतही अनुत्तीर्ण झाल्याने मानसिक तणावाखाली वावरणाऱ्या शिराळा येथील २५ वर्षीय विद्यार्थिनीने शनिवारी अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकातील नेक्स्ट लेव्हल मॉलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. रूपाली सुरेश बुंंदाडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. एक वर्षापासून आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत होते, असे पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीवरून पुढे आले आहे.
गर्ल्स हायस्कूल चौकापासून मालटेकडीकडे जाणाऱ्या रोडवर प्रवीण मालू व वरुण मालू यांचे नेक्स्ट लेव्हल मॉल हे व्यापारी संकुल आहे. शनिवारी सकाळी १०.३७ वाजताच्या सुमारास रूपाली बुंदाडे ही मॉलच्या पाचव्या मजल्याच्या गच्चीवर अप अँड अबाऊ हॉटेलमध्ये गेली. तिने सोबत आणलेली पर्स टेबलवर ठेवली आणि बॉटलमधील थोडे पाणी पिऊन थेट पाचव्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारली. तिच्या किंकाळीने तेथील काही नागरिक बाहेर पाहायला आले. त्यावेळी रूपाली मॉलच्या पुढे पडलेली होती. तेथील जिममधून बाहेर पडलेले पोलीस शिपाई अविनाश आत्राम (ब.नं. ३१७) यांनी तिला उचलून आॅटोरिक्षात टाकून तात्काळ इर्विनला आणले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनीसुद्धा घटनास्थळ गाठले. पोलिसांनी रूपालीने टेबलवर ठेवलेल्या पर्सची पाहणी केली. त्यात सुसाइड नोट आणि तिचा मोबाइल फोन मिळाला.
अप अँड अबाऊ हॉटेलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मॉलच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर अप अँड अबाऊ हे आलीशान हॉटेल आहे. तेथील सुरक्षा तोकडी मात्र असल्याचे या घटनेने स्पष्ट केले. शनिवारी सकाळी हॉटेल उघडण्याच्या बेतात असताना रूपाली लिफ्टने पाचव्या मजल्यावर आली आणि टेरेसकडे गेल्याची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. त्यानंतर तिने टेरेसच्या भिंतीवर चढून उडी घेतली. ही बाब मॉलच्या खाली उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनीही पाहिली. रूपाली हॉटेलमध्ये पोहोचली, ती टेरेसच्या दिशेने गेली; तिला कुणी हटकले का नाही? ती कशासाठी आली हेही विचारावेसे कुणाला का वाटले नाही? हॉटेलच्या संरक्षणभिंतीवर चढून कुणीही उडी घेऊ शकतो का? हॉटेल मालकाने सुरक्षेसाठी उपाय करणे गरजेचे होते. ती त्यांची जबाबदारीच आहे. त्यामुळे हॉटेल व मॉलच्या मालकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.
वर्षभरापासून आत्महत्येचा विचार
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात राहिलेले विषय कसेबसे उत्तीर्ण केल्यानंतर रूपालीने एमबीएला प्रवेश घेतला होता. त्यामध्येही अनुत्तीर्ण झाल्याची खंत रूपालीच्या मनात घर करून बसली. आई-वडिलांनी तिचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. याच अनुषंगाने तिने स्वत:ला बरेच दिवसांपासून लायब्ररीत गुंतवून घेतले होते. संगीतात मन रमविले. मात्र, तिच्या मनातून आत्महत्येचा विचार जातच नव्हता. आई-वडील लग्नासाठी मुले पाहत होती; मात्र लग्नानंतरही आत्महत्या केली असती, असे रूपालीने सुसाइड नोटमध्ये नमूद केले.
बाबा, मी बारा वाजेपर्यंत येते..
्नरूपालीचे वडील शिराळा येथे पोस्टमास्टर आहेत. शुक्रवारी रूपालीने कॉलेजचा कार्यक्रम असल्याचे सांगून शिराळा येथून अमरावती गाठले. मैत्रिणीच्या घरी थांबत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. शनिवारी सकाळीच वडिलांना फोन करून बारा वाजेपर्यंत येणार असल्याचे. मात्र, त्यानंतर तिने आत्महत्या केली. वडिलांच्या आधी तिने भाऊ शुभम व दोन मैत्रिणींनाही कॉल केला होता. ती रात्रभर कुण्या मैत्रिणीकडे थांबली, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.