टायर फुटलेल्या कारचा भीषण अपघात, तरुणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 05:00 AM2022-02-05T05:00:00+5:302022-02-05T05:00:58+5:30
अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिता हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : दर्यापूरहून गावी अंजनगावसुर्जी येथे जात असताना चारचाकीचा टायर फुटून झालेल्या अपघातात अनियंत्रित झालेल्या कारमधील १७ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली. तिचे आई-वडील व कारने धडक दिलेल्या अन्य दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार दुपारी साडेचार वाजता तालुक्यातील इटकी फाट्यानजीक घडली.
अर्पिता राजेश गिरी (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. राजेश त्र्यंबक गिरी (४७), रेखा राजेश गिरी (४०, तिघेही रा. अंजनगाव सुर्जी) हे दाम्पत्य तसेच विशाल गजानन सोळंके (२८), प्रतीक्षा विशाल सोळंके (२३, दोघेही रा. घोंडसगाव, ता. अंजनगाव सुर्जी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिता हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिचे आई-वडील तसेच दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर नागरिकांनी मृत तरुणी व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले. यानंतर चारही जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. वृत्त लिहिस्तोवर तेथील पोलीस ठाण्याने पंचनामा सुरू केला होता.