तरुणीची आत्महत्या; फ्रेजरपुरा ठाण्यावर प्रक्षुब्ध जमाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:17+5:302021-07-25T04:12:17+5:30

फोटो पी २४ फ्रेजरपुरा अमरावती : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विमनस्क झालेल्या एका २६ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या ...

Young woman's suicide; An angry mob at Frazerpura police station | तरुणीची आत्महत्या; फ्रेजरपुरा ठाण्यावर प्रक्षुब्ध जमाव

तरुणीची आत्महत्या; फ्रेजरपुरा ठाण्यावर प्रक्षुब्ध जमाव

Next

फोटो पी २४ फ्रेजरपुरा

अमरावती : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विमनस्क झालेल्या एका २६ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. २३ जुलै रोजी तिचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंजली सुभाष वानखडे (२६, रा. सिद्धार्थ मंडळाजवळ, फ्रेजरपुरा) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी शनिवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यावर धडक दिली.

तत्पूर्वी, मृताचे कुटुंबीय व फ्रेजरपुऱ्यातील स्थानिकांनी आयुक्त कार्यालयात जाऊन आरोपीच्या अटकेची मागणी बुलंद केली. या जनाक्रोशानंतर शनिवारी दुपारी मुलीचे वडील सुभाष दयाराम वानखडे (६३) यांच्या तक्रारीवरून कुणाल प्रल्हाद मेश्राम व एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष वानखडे यांच्या तक्रारीनुसार, दोन्ही मुले नोकरीनिमित्त घराबाहेर असताना ते मुलीसह घरी होते. १९ जुलै रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास मुलगी तिच्या खोलीमधून बाहेर आली. तिने आपबीती कथन केली. कुणाल मेश्रामशी आपले चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. तो आता लग्न करण्यास नकार व धमकी देत असल्याने आपण विष घेतल्याचे तिने वडिलांना सांगितले. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात हलिवण्यात आले, उपचारादरम्यान तिचा २३ जुलै रोजी मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नोकरी लागल्यानंतरही नकार

एका ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आरोपी कुणालशी ओळख झाली. त्याने तिला प्रेमजाळ्यात ओढले. लग्न करण्याची बतावणीदेखील केली. त्याला रेल्वेत अकोला येथे नोकरी लागली. त्यानंतर त्याने वारंवार दिलेला नकार, त्याच्या कुटुंबाकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या मामाने केला.

दोन दिवस तक्रारच घेतली नसल्याचा आरोप

मृत मुलीचे मामा प्रा. भरत नाईक यांच्यानुसार, १९ ला घटना घडल्यानंतर २० व २१ जुलै रोजी फ्रेजरपुरा पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही. मुलीचे बयान नसल्याचे कारण सांगण्यात आले. २२ जुलै रोजी पुन्हा ठाण्यात आल्यानंतर चौकशीस सुरुवात केल्याचे ठाणेदारांकडून सांगण्यात आले. त्याचदिवशी घटनास्थळाहून विषाची बॉटल व पेला जप्त करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.

काय म्हणाले ठाणेदार?

२१ जुलै रोजी मृतक मुलीचे वडील आपल्याकडे तक्रार घेऊन आले. आरोपीविरुद्ध शोषणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, तसा गुन्हा दाखल करण्यासाठी पीडिताचा जबाब आवश्यक असतो. ती मुलगी बेशुद्धावस्थेत होती. बयाण घेणे शक्य झाले नाही. त्यानंतर लगेचच पोलिसांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. विषाची बॉटल व पेला जप्त केला. एखादा व्यक्ती मरण्यापूर्वी एखाद्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा वा अन्य गुन्हा कसा दाखल करणे कायदेसंगत नसल्याची प्रतिक्रिया फ्रेजरपुरा येथील ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी ‘लोकमत’कडे दिली.

Web Title: Young woman's suicide; An angry mob at Frazerpura police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.