अनैतिक संबंधाबाबत हटकले, धाकट्याने मोठ्याला संपविले; मेळघाटातील हरिसाल येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 12:19 PM2022-12-02T12:19:44+5:302022-12-02T12:26:55+5:30

छातीत भोसकला चाकू

younger brother killed elder brother by stabbing him in the chest in harisal amravati | अनैतिक संबंधाबाबत हटकले, धाकट्याने मोठ्याला संपविले; मेळघाटातील हरिसाल येथील घटना

अनैतिक संबंधाबाबत हटकले, धाकट्याने मोठ्याला संपविले; मेळघाटातील हरिसाल येथील घटना

Next

धारणी (अमरावती) : पत्नी व मुले असताना शेजारच्या गावातील महिलेशी अनैतिक संबंध का ठेवतोस, अशी विचारणा करणाऱ्या मोठ्या भावाच्या छातीत चाकू भोसकून धाकट्याने त्याला संपविले. धारणी तालुक्यातील हरिसाल येथे बुधवारी उशिरा रात्री ही घटना घडली. मृताच्या पत्नीने धारणी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.

पोलिस सूत्रांनुसार, अनिल शिवनाथ चव्हाण (३२, रा. हरिसाल) असे मृताचे नाव आहे. सुनील शिवनाथ चव्हाण (३०, रा. हरिसाल) असे आरोपीचे नाव आहे. हरिसाल येथे अनिल व सुनील हे एकत्र कुटुंबात राहत होते. सुनीलला पत्नी व चार मुले असतानाही नजीकच्या गावातील एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. हे संबंध तोडून संसाराकडे लक्ष देण्याबाबत अनिलसह त्याचे आई-वडीलदेखील वारंवार बजावत होते. तथापि, सुनील जुमानत नव्हता. तो काही दिवसांपासून घरीदेखील राहत नव्हता. त्यामुळे त्याची पत्नी व मुले यांचा सांभाळ आई-वडील करीत होते.

बुधवारी रात्री ११ च्या सुमारास सुनील हा घरी आला. त्याची पत्नी फुलवंती स्वयंपाक करीत होती. याच वेळी अनिल तेथे आला आणि विवाहबाह्य संबंध तोडून संसाराकडे लक्ष दे, असे पुन्हा बजावले. यावेळी मात्र संतापलेल्या सुनीलने त्याच्याशी वाद घातला. विपरीत घडणार असल्याचे हेरून फुलवंतीने शेजारच्या सरिता धुर्वे यांना बोलावले. दोघींनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सुनीलने खिशातून धारदार चाकू काढून अनिलच्या छातीत भोसकला आणि तेथून पळ काढला.

रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अनिलचा जागीच मृत्यू झाला. काका अमरनाथ चव्हाण व मो. सलीम अब्दुल कादर यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक सुयोग महापुरे, कर्मचारी योगेश राखोंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अंजनगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिंद्र शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पतीविरुद्ध तक्रार

भावाचा खून करणाऱ्या सुनीलची पत्नी फुलवंतीनेच पतीविरुद्ध तक्रार दिली. यामुळे धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा शोध धारणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास राठोड यांच्यासह १५ जणांचा चमू घेत आहे. फुलवंती व 'त्या' महिलेची चौकशी करून बयाण घेण्यात आले आहे.

पत्नी जखमी

मृत अनिल व आरोपी सुनील यांच्यातील वाद सोडविण्याच्या प्रयत्नात सुनीलच्या हातातील चाकू फुलवंतीच्या हाताला लागला. तिला गंभीर जखम झाली आहे. तिच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: younger brother killed elder brother by stabbing him in the chest in harisal amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.