लग्न कर, अन्यथा ‘ते’ फोटो व्हायरल करेन! धमकी देत तरूणीचा विनयभंग
By प्रदीप भाकरे | Published: March 29, 2023 02:35 PM2023-03-29T14:35:57+5:302023-03-29T14:36:32+5:30
अल्पवयीन मुुलाच्या हातून पाठविली चिठ्ठी
अमरावती : लग्न कर अन्यथा ‘ते’ फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देत एका तरूणीचा विनयभंग करण्यात आला. चांदुरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी त्या २१ वर्षीय तरूणीच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी २८ मार्च रोजी रात्री आरोपी शुभम भीमराव हरणे (२५, रा. तळवेल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनसुार, फिर्यादी तरूणी व आरोपी शुभममध्ये वर्षभरापासून संवाद होता. त्या संवादाचे प्रेमात देखील रूपांतर झाले. दोघेही सोशल मिडियावर व्यक्त होऊ लागले. दरम्यान, जानेवारी महिन्यात ती तरूणी परीक्षेचे हॉल तिकीट घेण्याकरिता चांदूरबाजार येथे आली असता शुभम तेथे पोहोचला. तुझ्यावर खूप प्रेम आहे. असे म्हणून माझ्यासोबत चल नाहीतर मी तुझे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देऊन तो निघून गेला. दरम्यान, २७ मार्च रोजी एक विधिसंघर्षित बालक फिर्यादी तरूणीच्या घरासमोर हातात चिठ्ठी घेऊन आला. तिच्या आईने त्याला हटकले असता तो तेथून पळून गेला.
कॉलेजला जाताना पाठलाग
दरम्यान, फिर्यादी ही ज्यावेळी कॉलेजला आली त्या त्या वेळी देखील आरोपीने तिचा पाठलाग केला. माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने वारंवार दिली. या संपुर्ण प्रकारामुळे तिची सामाजिक बदनामी देखील झाली. त्यामुळे धाडस करून तिने ही बाब कुटुंबियांच्या कानावर घातली. २७ मार्च रोजी उशिरा रात्री तिने पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिचे बयान नोंदवून घेतले.