भंगार एसटी बसेस विरोधात युवक काँग्रेस आक्रमक; विभागीय नियंत्रण कार्यालयावर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 08:06 PM2023-09-18T20:06:18+5:302023-09-18T20:06:26+5:30
अमरावती विभागातील एसटी महामंडळाच्या अनेक बस गाड्या भंगार झाल्या आहेत.अशा स्थितीत जिल्ह्यात एसटी बसेसची अवस्था खराब असताना प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.
अमरावती : मेळघाटात दररोज कुठल्या ना कुठल्या ठिकाणी एसटी बस रस्त्यात कुठेही बंद पडत आहेत. भंगार व नादुरुस्त बसगाड्या पाठविल्या जातात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांना भंगार बसेसमुळे मनस्ताप होत आहे. त्यामुळे सोमवारी युवक काँग्रेसने विभाग नियंत्रक कार्यालयावर धडक देत तातडीने मेळघाटात नवीन एसटी बसेस देण्याची मागणी विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अमरावती विभागातील एसटी महामंडळाच्या अनेक बस गाड्या भंगार झाल्या आहेत.अशा स्थितीत जिल्ह्यात एसटी बसेसची अवस्था खराब असताना प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. भंगार व नादुरुस्त बसेस तात्पुरत्या दुरुस्तीनंतर प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. या बसेस मेळघाटातील अनेक गावातही सोडल्या जातात; परंतु दररोज कुठे ना कुठे एसटी बसेस बंद पडतात. तर काहीवेळा किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत असतात.
एसटी बसेसच्या या स्थितीमुळे अनेकदा आदिवासी बांधवांना मनस्ताप सहन करावा लागतो. विशेष म्हणजे शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही याचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे मेळघाटात धोकादायक भंगार बसेसमध्ये प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रवास करताना कधी काय होईल हे सांगता येत नाही. भंगार झालेल्या बसेस रस्त्यावर बिनदिक्कतपणे धावतात हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गंभीर प्रकार आहे. या प्रकाराकडे परिवहन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार बंद करून नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे,नीलेश गुहे, समीर जवंजाळ, योगेश बुंदेले, वैभव देशमुख, अंकुश जूनघरे, अक्षय साबळे,संकेत साहू, सुजल इंगळे, सौरभ कोहळे,निराज कोकाटे, आकाश गेडाम, आदित्य पाटील, केदार भेंडे आदींनी दिला आहे.