युवक दगावला; चुकीच्या उपचाराला पडला बळी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:01 IST2024-12-16T11:00:41+5:302024-12-16T11:01:58+5:30
Amravati : रोष, खासगी डॉक्टरवर कारवाईची मागणी

Youth dies of fraud; victim of wrong treatment?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गणपतीनगर येथील आदिशक्ती अपार्टमेंट येथील रहिवासी दीपक रमेश आठवले या ३५ वर्षीय युवकाचा शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. खासगी डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे दीपक दगावल्याचा रोष नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. संबंधित डॉ. विवेक भोयर यांनी दीपकला मृतावस्थेत इर्विन रुग्णालयात सोडून तेथून पळ काढल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात दीपकची आई शोभा आठवले यांनी राजापेठ ठाण्यामध्ये तक्रारदेखील दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, अकोला येथील रहिवासी असलेला दीपक आठवले हा नोकरीच्या निमित्ताने अमरावतीमध्ये पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलीसह येथे भाड्याने राहत होता. तो एका सोलर कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता. १२ डिसेंबर रोजी त्याला सर्दी, ताप असल्याने गोपालनगर येथील डॉ. विवेक भोयर यांच्याकडे त्याने उपचार घेतले. १३ डिसेंबरला त्याची प्रकृती थोडी बिघडली. डॉ. भोयर यांनी दिलेली औषधी त्याने घेतली. त्याच दिवशी त्याची आई शोभा आठवलेदेखील अकोल्यावरून त्याच्या घरी आल्या होत्या. १४ डिसेंबरला पुन्हा मायलेक संध्याकाळी साडेपाच वाजता डॉ. भोयर यांच्या दवाखान्यात गेले. यावेळी डॉ. भोयर यांनी त्याला सलाईन लावून त्यामध्ये तीन इंजेक्शन सोडले. दीपक तेथून घरी परतल्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने शोभा यांनी डॉ. भोयर यांना कॉल करून घरीच बोलावले. त्यांनी पुन्हा त्याला इंजेक्शन दिले. यानंतर दीपकची प्रकृती जास्त बिघडल्याने डॉ. भोयर आणि शोभा आठवले यांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यास सांगितले. डॉ. भोयर यांनी सायंकाळी साडेसात वाजता इर्विनमध्ये दीपकला आणून तेथून पळ काढला.
माझ्या भावाला साधा ताप होता
माझ्या भावाला साधा सर्दी, ताप होता. गोपालनगर येथील डॉ. विवेक भोयर यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनी सलाइनमध्ये तीन इंजेक्शन दिले. घरी आल्यावर प्रकृती बिघडल्यावर त्यांना घरी बोलवल्यावर पुन्हा त्यांनी इंजेक्शन देताच प्रकृती जास्त बिघडली. त्यांनी माझ्या भावाला इर्विनमध्ये आणून तेथून पळ काढला. चुकीच्या उपचारामुळेच भावाचा मृत्यू झाल्याने डॉ. भोयरांवर कारवाईची मागणी दीपक यांचे ज्येष्ठ बंधू सतीश आठवले यांनी केली आहे.