लसीकरण नोंदणीसाठी तरुणाई सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:36+5:302021-05-09T04:13:36+5:30
अमरावती : लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी ज्या प्रमाणात रांगा लागत आहेत. त्याप्रमाणे आता ऑनलाइन नाव नोंदणीसाठी प्रतीक्षेची वेळ नागरिकांवर ...
अमरावती : लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी ज्या प्रमाणात रांगा लागत आहेत. त्याप्रमाणे आता ऑनलाइन नाव नोंदणीसाठी प्रतीक्षेची वेळ नागरिकांवर आलेली आहे. शासनांमार्फत १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑनलाइन नाव नोंदणीला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दिवसभराचे शेड्यूल काही वेळातच बुक होत आहे.
शासनाने आता १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मात्र ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली आहे. शासन प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या या लसीकरणासाठी महापालिका क्षेत्रात ११ खासगी दवाखान्यात ११ जिल्ह्यांतील रुग्णालयांत ४ आणि ग्रामीण भागासाठी ४९ याप्रमाणे लसीकरण केंद्र स्थापन केली आहेत. जिल्ह्यातील १८ ते ४६ वर्षांवरील १३ लाख ५ हजार ४६ नागरिक आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर २०० नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ मेपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यापूर्वी २८ एप्रिलपासून नाव नोंदणी शासनाच्या कोविन जीओही डाट इन या वेबसाईटवर सुरुवात करण्यात आली होती. नाव नोंदणीनंतर लसीकरण केंद्र निवडीसाठी व दिवस निश्चितीसाठी आरोग्य विभागाच्यावतीने १ मेपासून शेड्यूल देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी दुपारी ३ ते ४ या काळात वरील वेबसाईट खुली ठेवली जाते. सुरुवातीला काही दिवस बुकिंग व्यवस्थित झाले. परंतु नोंदणीसाठी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्यामुळे काही सेकंदात दिवसाची उद्दिष्ट पूर्ण होत असल्यामुळे शेड्यूलसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोट
सुरुवातीला लसीकरणासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत केलेल्या जनजागृतीमुळे कोरोना लस टोचून घेण्याकडे तरुणांसह नागरिकांचा ओढा वाढला आहे.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी