अमरावतीमधील लायब्ररी चौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून; जुन्या वादाचा वचपा

By प्रदीप भाकरे | Published: May 11, 2023 06:39 PM2023-05-11T18:39:33+5:302023-05-11T18:40:02+5:30

Amravati News पूर्ववैमनस्य व वचपा घेण्याच्या उद्देशाने एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना १० मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा भागातील लायब्ररी चौकात घडली.

Youth stabbed to death in Library Chowk; An old debate | अमरावतीमधील लायब्ररी चौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून; जुन्या वादाचा वचपा

अमरावतीमधील लायब्ररी चौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून; जुन्या वादाचा वचपा

googlenewsNext

अमरावती : पूर्ववैमनस्य व वचपा घेण्याच्या उद्देशाने एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना १० मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा भागातील लायब्ररी चौकात घडली. घटनेनंतर काही तासांतच या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. निखिल ऊर्फ बाबू राजेश तिरथकर (२४, रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा) असे मृतकाचे नाव आहे. मृतक तरुणाने सहा महिन्यांपूर्वी मुख्य मारेकऱ्याच्या लहान भावावर जीवघेणा हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. त्याचा वचपा म्हणून निखिलचा खून झाल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले.

             फ्रेजरपुरा पोलिसांनुसार, देवा रामअधार जयस्वाल (२६) असे मुख्य मारेकऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह विजय किसनलाल मंडले (३९), शक्ती प्रवीण वाघमारे (२७), करण श्याम मंडले (२४), विशाल पवन मंडले (२३) आणि शुभम प्रकाश परिवाले (२४, सर्व रा. फ्रेजरपुरा) या सहा जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी पहाटेपर्यंत अटक केली. निखिल तिरथकर याने ऑक्टोबर २०२२ मध्ये देवा जयस्वालच्या लहान भावावर चाकूने वार करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यावेळी निखिल तिरथकरविरुद्ध फ्रेजरपुरा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळीपासून देवा जयस्वाल आणि निखिल तिरथकर यांच्यात एकमेकांना पाहण्याची ‘खुन्नस’ होती.
 

पोलिसांनी वाद शमवला
बुधवारी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा परिसरात शक्ती वाघमारेचा त्याच्या घरालगत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. ते भांडण चांगलेच वाढले होते. दरम्यान, या वादात निखिल तिरथकरने मध्यस्थी केली होती. तसेच हा वाद झाल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार गाेरखनाथ जाधव यांच्यासह पोलिस ताफा फ्रेजरपुरा चौकात पोहोचला होता. पोलिसांनी भांडण करणाऱ्यांसह जमलेल्या लोकांना घरात पाठवले. त्यावेळी शक्ती आणि निखिल हे सुद्धा आपापल्या घराकडे निघून गेले.


पोलिस होते चौकात, गल्लीत झाला गेम

दरम्यान, त्याचवेळी सुमारे निखिल तिरथकर हा लायब्ररी चौका नजीकच्या एका गल्लीत गेला असता देवा जयस्वाल, शक्ती वाघमारे व इतर चौघे अशा सहा जणांनी मिळून निखिलला अडवले. त्यावेळी देवा जयस्वालने निखिलच्या दोन्ही मांड्यांवर चाकूचे घाव केले. त्यानंतर मारेकरी पसार झाले. त्याचवेळी चौकात असलेल्या पोलिसांनी गल्लीत धाव घेतली. त्याला तत्काळ पोलिस वाहनातून इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरूच असताना काही वेळात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेहाल मुकेश तिरथकर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Youth stabbed to death in Library Chowk; An old debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.