युवा स्वाभिमानने ठोकले विद्यापीठाला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:37 PM2018-10-17T21:37:46+5:302018-10-17T21:38:07+5:30
बडनेरा विधानसभा मतदारसंघाने आ. रवि राणाद्वारे स्थापित युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आणि प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून कुलगुरूंच्या कार्यशैलीचा बुधवारी निषेध नोंदविला. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन प्रवेशद्वारावर चिकटविण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघाने आ. रवि राणाद्वारे स्थापित युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आणि प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून कुलगुरूंच्या कार्यशैलीचा बुधवारी निषेध नोंदविला. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन प्रवेशद्वारावर चिकटविण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.
युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे अनूप अग्रवाल, नीलेश भारती, धीरज केणे, नीलेश भेंडे आदींच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी परीक्षा विभाग, युवा महोत्सव परीक्षणात घोळ, अभियांत्रिकी महाविद्यालयांना कॅरीआॅन, विद्यार्थी विकास मंडळ बरखास्त करण्यासह विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने विद्यापीठात धडक दिली. मात्र, आंदोलक तीव्र भूमिका घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने अगोदरच अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्याअनुषंगाने विद्यापीठ परिसराला छावणीचे रूप आले होते.
प्रारंभी युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच रोखून फ्रेजरपुरा ठाण्याचे निरीक्षक आसाराम चोरमले यांनी आत प्रवेश घेण्यास मनाई केली. त्यामुळे विद्यार्थी व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला.
अनूप अग्रवाल, नीलेश भेंडे यांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला कुलगुरूंसोबत चर्चा करून मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे, असे बोलून प्रवेश मिळविला. मात्र, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांचे दालन असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांनी पुन्हा आंदोलकांना रोखले. कुलगुरूंची परवानगी असल्याशिवाय आत जाता येणार नाही, अशी भूमिका सुरक्षा रक्षकांनी घेतली. काही वेळाने प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आलेत; मात्र प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप असल्याने चॅनेल गेटच्या एका बाजूला विद्यार्थी आणि दुसºया बाजूला जयपूरकर असा संवाद चालला. आम्हाला आत येऊ द्या, आम्ही चोर, गुंड किंवा दरोडेखोर नाही, असा मुद्दा युवा स्वाभिमानने यावेळी उपस्थित केला. यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर लावलेले कुलूप काढण्याबाबत सुरक्षा रक्षकांसोबत शाब्दिक वादही झाला. यानंतर कुलगुरू मुरलीधर चांदेकर आंदोलक आले; मात्र प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप कायम होते. माइंड लॉजिक कंपनीचा करार तात्काळ रद्द करण्यासह कॅरीआॅन, युवा महोत्सव परीक्षणातील घोळ अशा प्रश्नांवर तोडगा काढा, अशी मागणी त्यांनी ठेवली. यावेळी परीक्षा व मूल्यांकन संचालक हेमंत देशमुख उपस्थित होते. कुलगुरू चांदेकरांच्या उत्तराने विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. यादरम्यान प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यावरून पोलिसांसोबत शाब्दिक वादही झाला.
अखेर युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने इमारतीचे प्रवेशद्वार आणि विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप ठोकून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अभिजित देशमुख, अनूप अग्रवाल, महेश भारती, नीलेश भेंडे, धीरज केणे, मयूर कैथवास, अंकुश ठाकरे, रौनक किटुकले, अमर काळमेघ, अभिजित काळमेघ, राहुल काळे, आकाश राजगुरे, नीलेश गहलोत, कौस्तुक मिरजारपुरे, निरंजन अग्रवाल, प्रफुल्ल फुरगुंडे, कुलदीप निर्मळ, प्रफुल्ल इंगोले, निखील सातनूरकर आदींनी आंदोलनाची धुरा सांभाळली.