युवा स्वाभिमानी संघटनेची अमरावतीत खासगी फायनान्सच्या कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:51 PM2020-07-23T21:51:02+5:302020-07-23T21:53:03+5:30
युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंत टॉकीजनजीकच्या एका खासगी फायनान्सच्या कार्यालयात बुधवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. तेथील साहित्याची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी फायनान्स कंपनीचे अधिकारी कर्मचारी नागरिकांना विनाकारण त्रास देत असून, अवैधरीत्या पठाणी वसूली करीत आहे. वस्तू फायन्स केल्यानंतर कोरोनाची साथ असतानाही अवाजवी व्याज आकारून ते वसुली करण्याकरिता नागरिकांना रात्री-बेरात्री फोन करून धमकावितात. या कारणावरून संतापलेल्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंत टॉकीजनजीकच्या एका खासगी फायनान्सच्या कार्यालयात बुधवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. तेथील साहित्याची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तीन कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावून शाखा व्यवस्थापकाला कार्यालयात डांबले.
लॉकडाऊनच्या काळात आधीच नागरिक त्रस्त झाले असताना ज्या नागरिकांनीत् या कंपनीकडून वस्तू फायन्सवर खरेदी केल्या आहेत. त्या नागरिकांना त्रास देणे सुरू असून, पठाणी वसुली बंद करा, यासंदभार्चा जाब विचारण्याकरिता कार्यकर्ते कार्यालयात पोहचले असता, येथील शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. तेव्हा संतापलेल्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकाला धक्काबुक्की करून येथील फर्निचरची नासधूस करून खुर्च्या फेकल्या. त्यानंतर शाखा व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांना कार्यालयातच डांबून ठेवण्यात आले.
सदर आंदोलन युवा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष नीलेश भेंडे, पराग चिमोटे यांच्या नेतृत्वात रवी अडोकार, पराग चिमोटे, सद्दाम हुसेन, अंकुश मेश्राम, राहुल काळे, शुभम उंबरकर, अजय बोबडे, दीपक तायोड आदींची उपस्थिती होती. येथील शाखा व्यवस्थापकाने चांगल्या वागणुकीची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र यानंतर विनाकारण नागरिकांना त्रास दिल्यास त्या कार्यालयाला कायमचे कुलूप ठोकू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यासंदर्भात बजाज फिन्सरचे कर्मचारी नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी दिली.