नववर्षाचे उत्साहात स्वागत तरुणांनी राखला संयम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:00 AM2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:28+5:30
दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या भरात एखादी अप्रिय घडून गालबोट लागते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त लावला होता. कडाक्याच्या थंडीतही पोलीस नागरिकांच्या, तरुणाईच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सज्ज होते. मात्र, यंदा रस्त्यावर लोकांचे आवागमन खूपच कमी असल्याचे आढळले. हा थंडीचा प्रभाव की पोलिसांच्या बंदोबस्ताचा, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘थर्टी फर्स्ट’ हा उत्साहाचा उत्सवच. यंदाही तोच उत्साह नववर्षाचे स्वागत करताना अमरावतीकरांमध्ये दिसून आला. मात्र, यंदा नववर्षाचे स्वागत कमालीच्या संयमाने झाले. अर्थात थंडीचा कडाका आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त होताच. यंदा तरुणाईने नववर्षांचे जल्लोषात, पण शांततेत स्वागत केले, हे विशेष.
दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या भरात एखादी अप्रिय घडून गालबोट लागते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त लावला होता. कडाक्याच्या थंडीतही पोलीस नागरिकांच्या, तरुणाईच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सज्ज होते. मात्र, यंदा रस्त्यावर लोकांचे आवागमन खूपच कमी असल्याचे आढळले. हा थंडीचा प्रभाव की पोलिसांच्या बंदोबस्ताचा, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
दरम्यान, अमरावतीकरांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १२ च्या ठोक्याला २०२० या नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी आकाशात आतषबाजी करण्यात आली. बहुतांश नागरिकांनी आपआपल्या घरी किंवा निश्चित केलेल्या ठिकाणी जल्लोष करून नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. गल्लीबोळातून हॅपी न्यू ईअरच्या जल्लोष झाला. मात्र, रस्त्यावर उतरून जल्लोषाचा, उद्दामपणाचा प्रकार झाला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. विशेष म्हणजे, यंदा तरुणाईने संयम राखला. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असे कृत्य केले नाही. त्याबाबत पोलिसांनीही तरुणाईचे कौतुक केले.
पाच वेगवान वाहने, तीन तळीरामांविरुद्ध कारवाई
वाहतूक शाखेच्या पूर्व-पश्चिम झोनच्या पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी फिक्स पॉइंट लावून वाहन तपासणी केली. यामध्ये पोलिसांनी नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या १८४ वाहनांवर कारवाई करीत ३६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. ब्रीथ अॅनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करून ड्रँक अँड ड्राइव्हप्रकरणी तीन आणि वाहनवेगाची मर्यादा ओलांडणाºया पाच जणांविरुद्ध कारवाईचा बडगा वाहतूक पोलिसांनी उगारला.
अमरावतीकरांनी नववर्षाचे स्वागत उत्साहात केले. मात्र, थंडीच्या प्रभावामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडले नाहीत. रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी असल्यामुळे अप्रिय घटनांची नोंद झालेली नाही. तथापि, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात होतेच.
- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त