वर्धा नदीपात्रात युवक गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:59+5:302021-09-17T04:17:59+5:30
मृत शिरजगाव बंडचा, अप्पर वर्धा प्रकल्पस्थळी छायाचित्र घेत असताना घडला प्रकार मोर्शी : अप्पर वर्धा धरण बघण्यासाठी शिरजगाव बंड ...
मृत शिरजगाव बंडचा, अप्पर वर्धा प्रकल्पस्थळी छायाचित्र घेत असताना घडला प्रकार
मोर्शी : अप्पर वर्धा धरण बघण्यासाठी शिरजगाव बंड येथून कुटुंबासमवेत आलेला ४० वर्षीय युवक सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून वर्धा नदीच्या पात्रात पडून वाहत गेल्याची घटना सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या तथा विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या १३ दारांपैकी सात दारे ६५ सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून ७३७ दलघमी प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अप्पर वर्धा धरणाची निर्धारित पातळी ३४२.५० मीटर असून सध्याची पातळी ही ३४२.४० मीटर इतकी आहे. धरण ९८.३० टक्के भरले असल्याने वर्धा नदीपात्रात दरवाजातून पाणी सोडले जात आहे. हे निसर्गरम्य धरण बघण्यासाठी व पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी देशभरातील पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.
चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील वाकोडे कुटुंब चारचाकीने धरण बघण्यासाठी आले होते. धरण बघण्याचा आनंद व आस्वाद घेत असताना वर्धेकडे जाणाऱ्या पुलावरून छायाचित्र घेत असताना प्रफुल्ल अशोक वाकोडे (४०) हा युवक नदीपात्रात पडून वाहत गेला. या युवकासोबत तीन महिला व चार-पाच मुले असल्याचे समजते. या घटनेची माहिती तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन शोध पथकाला याठिकाणी पाचारण केले. मात्र, झुंज येथे शोधपथक गेले होते. ते वरूड येथूनच मोर्शीकडे निघाले असल्याचे सांगण्यात आले. रात्री शोध मोहीम सुरू होते किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे. मोर्शीचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष चेचरे, अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अभियंता रमण लायचा हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत.