नौदलाच्या भरतीसाठी गेलेल्या युवकाचा मुंबईत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 09:14 PM2018-09-08T21:14:04+5:302018-09-08T21:14:29+5:30
मांजरखेड येथील रहिवासी : भोवळ येऊन मैदानावर कोसळला
मांजरखेड कसबा (अमरावती) : चांदूर रेल्वे तालुक्यातील युवकाचा नाविक जनरल (नौदल) भरतीसाठी धाव चाचणीदरम्यान कोसळून मृत्यू झाला. ही घटना वरळी पश्चिम (मुंबई) येथील समुद्र किनाऱ्यावरील कोस्ट गार्ड हेड क्वॉर्टर ग्राऊंडवर ६ सप्टेंबर रोजी घडली. त्याचा मृतदेह शनिवारी मांजरखेड येथे आणण्यात आला.
मांजरखेड कसबा येथील आशिष निरंजन बोबडे (२१) असे मृताचे नाव आहे. तो बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) पदवीधर होता. काही दिवसांपूर्वीच नेव्ही विभागात नाविक जनरल ड्यूटी या पदासाठी त्याने अर्ज केला होता. प्री-परीक्षा तो उत्तीर्ण झाल्याने त्याला मुंबई येथील हेड क्वॉर्टर कोस्ट गार्ड मैदानावर शारीरिक चाचणीसाठी बोलावणे आले. त्यासाठी तो ४ सप्टेंबर रोजी मुंबईत पोहोचला. मित्राच्या खोलीवर राहून त्याने चाचणीच्या अनुषंगाने माहिती मिळविली. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ऑनलाईन परीक्षाही त्याने दिली. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता धाव चाचणीकरिता तो ग्राऊंडवर आला.
मैदानावर धावताना अचानक भोवळ येऊन आशिष कोसळला. याची माहिती होताच तेथील अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचारानंतर नातेवाइकांना कऴवत सेंट्रल मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, वडील, धाकटा भाऊ, बहीण, काका-काकू असा आप्तपरिवार आहे. आशिष तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. शनिवारी त्याचे पार्थिव १२ वाजता मांजरखेड येथे आणले गेले. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.