यशोदानगर चौक की, फ्रुटमार्केट ?
By admin | Published: March 11, 2016 12:22 AM2016-03-11T00:22:05+5:302016-03-11T00:22:05+5:30
शहरातील अन्य रस्त्यांप्रमाणे यशोदानगर चौक आणि परिसराला अघोषितपणे फ्रुटमार्केटचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
यंत्रणेचे दुर्लक्ष : कारवाईची अपेक्षा, वर्षभरापूर्वी झाली होती हत्या
अमरावती : शहरातील अन्य रस्त्यांप्रमाणे यशोदानगर चौक आणि परिसराला अघोषितपणे फ्रुटमार्केटचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हा संपूर्ण परिसर हातगाड्यांनी व्यापला आहे. वाढत्या अतिक्रमणाने येथील रस्ते अरुंद बनलेत व पर्यायाने अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.
मोतीनगर चौकातून पुढे यशोदानगर चौकाच्या २०० मीटर आधिपासूनच अगदी रस्त्यावर हातगाड्या लागतात. येथे फळांसह भाजीपाला व तत्सम पदार्थ विकणाऱ्यांची भाऊगर्दी आहे. या चौकातील हार्डवेअर दुकानांसह अनेक प्रतिष्ठानांनी रस्त्यावर अतिक्रमण थाटत दुकानातील साहित्य रस्त्यावर सजविले आहे. या रस्त्यावरील पानटपरीसह मांसविक्रीचे दुकान व अन्य विविध वस्तू विक्रीच्या दुकानदारांनी रस्त्यावर कब्जा मिळविला आहे.
वर्षभरापूर्वी झाली होती हत्या
या रस्त्यावरील अतिक्रमणातील पानटपरीवरून झालेल्या वादात गतवर्षी एका तरुणाचा मुडदा पडला होता. या घटनेनंतर येथील अतिक्रमण पालिकेच्यावतीने हटविण्यात आले. मात्र आज परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
पोलिसांच्या समक्ष अतिक्रमण
यशोदानगर चौकात फ्रेजरपुरा पोलिसांची चौकीसुद्धा आहे. या भागात वाहतूक पोलीससुद्धा तैनात असतात; तथापि त्यांच्या डोळ्यासमोर खुलेआमरीत्या अडाणेश्वर मंदिरापर्यंत व पुढे अतिक्रमण केल्या जाते. या चौकात अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात. यशोदानगरकडून दस्तुरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर हातगाड्यांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागत असल्याचे चित्र आहे.
प्रतिष्ठानांसमोर अवैध पार्किंग
शहरातील अन्य भागांप्रमाणे यशोदानगर, दस्तुरनगर भागातील मोठमोठ्या प्रतिष्ठानांसह व्यावसायिक संकुलाला पार्किंगची जागाच नाही. एकतर दुकानातील नानाविध साहित्य बाहेर ठेवून अतिक्रमण केले गेले आहेत. त्यासमोर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागत असतात. वाहतूक पोलीस व मनपा यंत्रणा ढिम्म आहे. या रस्त्यांवर अवैधपणे सार्वजनिक जागांवर कब्जा करुन पानटपऱ्या लावण्यात आल्या आहेत. याखेरीज प्लायवूड व लाकडी सजावट करणाऱ्यांनीही अतिक्रमण केले आए्य.. पोलिसांच्या सहकार्याने पालिकेने या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.