गुटखा विक्रीविरोधात युवासेनेचा एल्गार
By Admin | Published: June 13, 2017 12:07 AM2017-06-13T00:07:02+5:302017-06-13T00:07:02+5:30
शहरासह जिल्हाभरात मागील अनेक महिन्यांपासून अवैधरित्या गुटखा विक्रीचा व साठेबाजाचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : तातडीने कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरासह जिल्हाभरात मागील अनेक महिन्यांपासून अवैधरित्या गुटखा विक्रीचा व साठेबाजाचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. राज्यात गुटखा बंदी असतानाही सरेआम अवैध धंदे सुरू आहेत. जिल्हाभरात त्वरित अवैध गुटखा विक्रीला आळा घालण्यात यावा, अशी मागणी सोमवारी अपर जिल्हाधिकारी के.आर. परदेशी यांच्याकडे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यावर तीन दिवसांत कारवाई न झाल्यास युवासेना जिल्हाकचेरी समोर गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू करेल, असा इशारासुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
राज्य शासनाने संपूर्ण राज्यभरात गुटखा बंदी लागू केली आहे. मात्र या बंदी आदेशाची पायमल्ली करीत शहरासह जिल्हाभरात अवैध गुटखा विक्रीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.
विशेष म्हणजे गुटख्याची जिल्ह्यातच निर्मिती होत असून यात अत्यंत घातक असे मादक पदार्थ मिसळवून विक्री सुरू आहे. मात्र याकडे प्रशासकीय यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अवैधरीत्या होणारी गुटखा विक्री व निर्मिती करणाऱ्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेनच्या वतीने अपर जिल्हाधिकारी व विविध ठिकाणच्या तहसीलदारांनाकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावर तीन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा युवासेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात गुटखा विक्रीचे दुकान सुरू करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख पराग गुडधे, वैभव मोहोकार, विक्रम लाड, गजेंद्र पाटेकर, मोहन येखंडे, रितेश काळे, नितीन भोरे, पराग नरसेकर, पंकज कदम, अभिजित भावे, अमोल गावंडे, मुन्ना शर्मा, शैलेश पांडे, संदीप मेहळे आदींनी दिला आहे.